Thursday, April 25, 2024
Homeनगरराहाता, कोपरगाव, श्रीरामपूर तालुक्यात नाफेडचे आधारभुत खरेदी केंद्रच नाही

राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर तालुक्यात नाफेडचे आधारभुत खरेदी केंद्रच नाही

शेतकर्‍यांची परवड तिनही तालुक्यात आधारभूत केंद्र सुरु करण्याचा आदेश लोकप्रतिनिधींनी द्यावेत; मागणी

राहाता (तालुका प्रतिनिधी)- सरकारच्या नाफेडमार्फत आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हरभरा खरेदी करण्यासाठी कोणतीही संस्था तयार नसल्याने राहाता, कोपरगाव व श्रीरामपूर तालुक्यातील शेतकर्‍यांना हरभरा विक्रीसाठी आता राहुरी केंद्रावर जावे लागणार असल्याने शेतकर्‍यांची मोठी परवड सुरू झाली आहे. या तिनही तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप करून प्रत्येक तालुक्यात आधारभुत केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकरी करत आहे.

- Advertisement -

शेतकर्‍यांच्या मालाला आधारभूत किंमत मिळावी, यासाठी केंद्र सरकारने नाफेडमार्फत तुर व हरभरा सरकारमार्फत खरेदी करते त्यासाठी तुरीला 5800 रुपये क्किंटल तर हरभरा साठी 4875 क्किंटल दर सरकारने जाहीर केले. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात पणनमार्फत खरेदी केंद्र सुरू केले जाते. त्याची जबाबदारी तालुक्यातील खरेदी विक्री संघ, विकास सोसायट्या व कृषी उत्पन्न बाजार समित्या यांच्याकडे दिली जाते.

नगर जिल्ह्यात राहाता कोपरगाव, व श्रीरामपूर हे तीन तालुके वगळता सर्व तालुक्यात तुर व हरबरा खरेदी केंद्र सुरू झाले, मात्र या तिनही तालुक्यात एकही सहकारी संस्थेने हे केंद्र सुरू करण्यास नकार दिल्याने पणनने राहुरी तालुक्यातील खरेदी केंद्रवर या तीन तालुक्यातील शेतकर्‍यांचा माल खरेदी करण्याची जबाबदारी दिल्याने शेतकर्‍यांच्यादृष्टीने हे न परवडणारे असून मोठे खर्चीकही ठरणार आहे. यामुळे चार पैसे मिळण्याऐवजी शेतकर्‍यांची परवडच होणार आहे.

सध्या हरभरा तयार होऊन शेतकर्‍याच्या घरात पडला असून खाजगी व्यापार्‍यांकडे भाव कमी आहे. चांगला प्रतिचा हरभरा 3500 ते 3800 रुपये क्किंटल या दराने खरेदी केला जात आहे. सरकारच्या हमी भावापेक्षा हजार रुपये दर कमी मिळत असून शेतकर्‍यांची लुट होत आहे. हेच खरेदी केंद्र सुरू झाले तर मोठ्या प्रमाणावर माल केंद्रावर जातो. तसेच खाजगी व्यापार्‍यांवरही चाप बसतो. मात्र सध्याच्या वातावरणात शेतकर्‍यांकडे पैसा राहिला नाही. त्यामुळे मजबुरीने कमी दरात हरभरा विक्री करण्याची वेळ आली आहे.

ज्या तालुक्यात खरेदी संस्था नाही तेथे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत खरेदी केंद्र सुरू केले जाते. मात्र कोपरगाव, राहाता, व श्रीरामपूर या तिनही तालुक्यातील बाजार समित्यांना पणन विभागाने खरेदी करावी, असे पत्र देऊनही संबधितांनी याला नकार दिला आहे. या तिनही तालुक्यातील लोकप्रतिनीधींनी शेतकर्‍यांचे हित ध्यानात घेऊन तिनही तालुक्यातील बाजार समित्यांना आधारभुत केंद्र सुरू करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या