कोल्हार भगवतीपूरमध्ये भाजी मार्केटचे अनोखे नियोजन

मात्र नागरिकांमध्ये सोशल डिस्टन्ससिंगचा अभाव

कोल्हार (वार्ताहर) – कोल्हार भगवतीपूरमध्ये गेल्या 3 दिवसांपासून कडकडीत लॉकडाऊन होता. भाजीपाल्याची मूलभूत आणि महत्त्वाची गरज लक्षात घेऊन कोल्हार बुद्रुक आणि भगवतीपूर ग्रामपंचायतने भगवतीदेवी मंदिरासमोर संपूर्ण परिसर बॅरिगेट्सद्वारे सील करत भाजी मार्केट उपलब्ध करून दिले. दोनच दरवाजांद्वारे आत प्रवेश व बाहेर निघण्याची सुविधा ठेवली. या दरवाजांवर मशिनद्वारे सॅनिटायझर फवारणी करण्यात येत होती. नागरिकांनी दूरपर्यंत रांगा लावून भाजीपाला खरेदी केला. मात्र रांगा असो अथवा भाजीमार्केटमध्ये खरेदी करताना नागरिकांनी सोशल डिस्टन्ससिंग पाळला नाही.

कोल्हारमध्ये कोरोनाबाधित परदेशी व्यक्ती मुक्काम करून गेल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र खळबळ उडाली. याच अनुषंगाने राहाता तहसीलदारांनी अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकाने 3 दिवसांकरिता कडकडीत बंद ठेवण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार संपूर्ण लॉकडाऊन पाळण्यात आला. काल मंगळवारी सकाळी लॉकडाऊन उठविण्यात आला. 3 दिवसांच्या कालावधीमध्ये गावात भाजीपाला उपलब्ध होऊ शकला नाही.

त्यामुळे जवळजवळ प्रत्येक घरांमध्ये भाजीपाल्याचा तुटवडा भासू लागला, म्हणूनच कोल्हार बुद्रुक आणि भगवतीपूर ग्रामपंचायतने भगवतीदेवी मंदिरासमोरील परिसर बॅरिगेट्सद्वारे सील केला आणि या भागात भाजीमंडई भरविण्याचे नियोजन केले. सील केलेल्या परिसरामध्ये प्रवेश करतांना आत प्रवेशासाठी एक आणि बाहेर निघण्यासाठी एक असे दोनच मार्ग ठेवण्यात आले. त्या दरवाजांच्या वरील बाजूला मशिन व पंप्सद्वारे सॅनिटायझर फवारणी केली जात होती. त्यामुळे आत प्रवेश करणारा व बाहेर निघणार्‍या व्यक्तीचे निर्जंतुकीकरण होताना पहावयास मिळाले. त्याचप्रमाणे नियोजित भाजीमार्केटमध्ये भाजीपाला विक्रेत्यांना ठराविक अंतरा- अंतरावर जागा देऊन बसविण्यात आले. त्यासाठी मार्किंग देखील केली.

याखेरीज भाजीपाला खरेदी करण्याकरिता मार्केटच्याबाहेर महिला-पुरुष नागरिकांनी रांगाचे पालन केले. प्रवेशद्वारातून आत सोडतानाही ग्रामपंचायत कर्मचारी 3-4 लोकांनाच एकावेळी आत सोडत होते. कोल्हार बुद्रुक माजी सरपंच अ‍ॅड. सुरेंद्र खर्डे, सहा. पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, श्रीरामपूर जिल्हा दूध संघाचे संचालक अनिल खर्डे, पद्मश्री डॉ. विखे कारखान्याचे संचालक स्वप्निल निबे, ग्रामविकास अधिकारी शशिकांत चौरे, ग्रामविकास अधिकारी एस. जी. कोते, ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी, पोलीस प्रशासन गर्दीवर नियंत्रण ठेवून होते.

मात्र प्रवेशद्वाराबाहेर महिला, पुरुष, तरुण व वयोवृद्ध नागरिकांच्या रांगामध्ये तसेच भाजी मार्केट भागात स्वयंशिस्त व सोशल डिस्टन्ससिंग नागरिकांनी फारसे पाळले नाही. रांगांमध्ये हे नागरिक बर्‍याच ठिकाणी खेटून उभे होते. तसेच मार्केटमध्ये खरेदी करताना खरेदीदारांनी सुरक्षित अंतर ठेवलेले नव्हते. यामुळे थोड्याशा प्रमाणात बेशिस्त पाहायला मिळाली. यादरम्यान भगवतीदेवी मंदिरावरील ध्वनिक्षेपकावरून वेळोवेळी आपापसांत अंतर ठेवण्याच्या सूचना केल्या जात होत्या. आठ वाजता सुरू केलेले हे मार्केट साडेदहा वाजता बंद करण्यात आले.

लॉकडाऊन उठवल्यामुळे भाजीपाला खरेदी करण्याकरिता नागरिकांची गर्दी होणार हे स्वाभाविक आहे. मात्र ही सुविधा ग्रामपंचायत उपलब्ध करून देत असताना नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणेही गरजेचे आहे. कोल्हार भगवतीपूरचा शुक्रवारी असणारा आठवडेबाजार बंदच ठेवण्यात येणार आहे. मात्र भाजी मंडईचे नियोजन करताना भाजीपाला अथवा फळे विक्रीकरिता फक्त येथील शेतकरी, व्यापारी अथवा व्यक्तींनाच परवानगी दिली जाईल. बाहेर गावातील व्यापारी अथवा व्यक्तींनी शेतीमाल विक्रीकरिता आणू नये अशा सूचना देण्यात आल्या.
अ‍ॅड. सुरेंद्र खर्डे, माजी सरपंच कोल्हार बुद्रुक


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *