केडगावात दहशत… चोरांची

केडगावात दहशत… चोरांची

एकाच रात्री पाच ठिकाणी चोर्‍या

अहमदनगर (प्रतिनिधी) – गुंडागर्दीच्या दहशतीतून सावरलेले केडगावकर आता चोरांच्या दहशतीखाली आले आहेत. केडगावात एकाच रात्री पाच ठिकाणी घरफोड्या करत चोरटे लाखोंचा ऐवज घेऊन पसार झाले. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बबन लक्ष्मण वाठोळे यांनी पोलिसांत तक्रार दिली असून त्यांचा सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. वाठोळे यांचे पुणे हायवेकडेला शिवसागर किराणा दुकान आहे. दुकानाच्या पाठीमागील बाजूचा दरवाजा तोडून चोरटे दुकानात घुसले. ड्रावरमधील 1 लाख 5 हजाराची रोकड आणि दुकानातील किराणा सामान असा 2 लाख 49 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

या चोरीनंतर चोरटे मोहिनीनगर भागात गेले. तेथील अशोेक रासकर, संचेती यांचे वक्रतुंड गॅस एजन्सीचे आणि आणखी एकाच्या घरात चोरी करून चोरटे पसार झाले.

दोन दिवसांपूर्वीच चोरट्यांनी शिवाजीनगर परिसरात एकाच रात्री सात घरफोड्या केल्या होत्या. त्यानंतर लगेचच केडगावात पाच घरफोड्या झाल्याचे समोर आले.

सावेडीत धूमखोरी
सावेडीत पुन्हा एकदा धूमखोरांनी 20 हजार रुपयाचा ऐवज ओरबडत पोबारा केला. रासनेनगरमध्ये काल सोमवारी ही घटना घडली. जयश्री अजयकुमार कासवा या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र धूमखोरांनी लंपास केले. कासवा या पायी जात असताना मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी त्यांना ‘पाटील कोठे राहतात’ असे विचारले. कासवा या विचार करत असतानाच मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडले. त्याचक्षणी धूमखोर सुसाट वेगाने पसार झाले. कासवा यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ड्राय फ्रुटसही लंपास
चोरट्यांनी वाठोळे यांच्या किराणा दुकानातून ड्राय फ्रुटस चोरून नेले. रोकडसोबतच चोरट्यांनी किराणा सामान तसेच काजू-बदाम, अक्रोड असा तेजदार माल लंपास केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com