कर्जत तालुक्यासाठी कुकडीचे 14 दिवस आवर्तन : आ. पवार
Featured

कर्जत तालुक्यासाठी कुकडीचे 14 दिवस आवर्तन : आ. पवार

Sarvmat Digital

सल्लागार समितीच्या नियोजनानुसार होणार पाण्याचे वितरण

कुळधरण (वार्ताहर) – नागपूर अधिवेशनाच्या वेळी कुकडी कालवा सल्लागार समितीची पाण्याच्या नियोजनासंदर्भात बैठक घेण्यात आली होती. बैठकीत 1 जानेवारी रोजी कुकडीचे आवर्तन सोडण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी कुकडीचे रब्बी आवर्तन सोडण्यात आले आहे.हे आवर्तन करमाळा तालुक्यासाठी सुमारे 9 दिवस, कर्जत तालुक्यासाठी 14 दिवस, श्रीगोंदा तालुक्यासाठी 10 दिवस, पारनेर तालुक्यासाठी 4 दिवस राहणार असून सल्लागार समितीच्या नियोजनानुसार पाण्याचे वितरण होणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.

नियोजन बैठकीसाठी कुकडी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार, दिलीप वळसे पाटील, श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे, पारनेरचे आमदार सुधीर लंके, अतुल बेनके आदी मान्यवर उपस्थित होते.

कर्जत-जामखेड मतदार संघामध्ये आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून पहिल्यांदाच अस्तरीकरण व पोटचार्‍यांच्या कामास सुरुवात झाली आहे. तब्बल पंचवीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या कुकडी प्रकल्पाला पुनरुज्जीवन प्राप्त झाले आहे.आमदार रोहित पवार यांनी गेली अनेक महिन्यांपासून पाण्याच्या नियोजनासाठी अनेक ठिकाणी अधिकार्‍यांच्या बैठका घेऊन अखेर कुकडीच्या पाणी नियोजनात यश मिळवले आहे. निवडणुकीदरम्यान दिलेले शब्द पाळले जात असल्याने मतदारसंघातील शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

‘कुकडी आवर्तन’ कळीचा मुद्दा
कर्जत जामखेड मतदारसंघातील निवडणुकीत कुकडीचे आवर्तन हा कळीचा मुद्दा होता. कुळधरण तसेच राशीन जिल्हा परिषद गटात सर्वाधिक कुकडी लाभक्षेत्र आहे. टेलपर्यंत पाणी पोहोचतच नसल्याने अनेक गावांतील शेतकर्‍यांनी पाणी देणार्‍या उमेदवाराला मतदान करू अशी भूमिका घेतली होती. रोहित पवार यांनी त्यावेळी शेतकर्‍यांना नियमित आवर्तन मिळवून देण्याचा शब्द दिला होता.तो आता सत्यात उतरताना दिसत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com