कर्जत : दामू गायकवाड यांच्या अवयवदानाने पाच रुग्णांना जीवदान
Featured

कर्जत : दामू गायकवाड यांच्या अवयवदानाने पाच रुग्णांना जीवदान

Sarvmat Digital

कर्जत (प्रतिनिधी)- कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिक येथील दामू पंढरीनाथ गायकवाड यांच्या अवयवदानाने 5 रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. मृत्युसमयी 52 वर्षांचे होते. गायकवाड हे पुण्याच्या ताडीवाला रोड परिसरात राहत होते. दौंड येथे बहिणीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी दौंड येथे गेले होते. त्यानंतर परतताना चक्कर येऊन ते कोसळले. या घटनेनंतर त्यांना पुणे येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या इच्छेनुसार रुबी हॉल क्लिनिक येथेच त्यांचे अवयव दान करण्यात आले. त्यांचे हृदय, डोळे, किडनी, फुफ्फुस यांचे रुग्णांना रोपण करण्यात आले. दामू गायकवाड यांचे हृदय दिल्ली येथील फोर्टीस हॉस्पिटलमधील रुग्ण महिलेस देण्यात आले. फुफ्फुस व यकृताचे मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमधील रुग्णास, तसेच एक किडनी रुबी हॉल क्लिनिकमधील रुग्णास व दुसर्‍या किडनीचे ससून हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण करण्यात आले.

कै. दामू गायकवाड यांची अवयव दान करण्याची इच्छा होती. ती खर्‍या अर्थाने पूर्ण झाली आहे. कै. दामू गायकवाड यांच्या इच्छेनुसार बंधू बंडू गायकवाड व भाचे गौतम आढाव यांनी अवयवदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी तातडीने हालचाल केल्यामुळेच 5 रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com