Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरसामायिक क्षेत्रात व्यक्तिगत हिस्सेदारास जिल्हा बँक कर्ज वितरण करणार

सामायिक क्षेत्रात व्यक्तिगत हिस्सेदारास जिल्हा बँक कर्ज वितरण करणार

जिल्हा बँकेचे संचालक करण जयंत ससाणे यांची माहिती

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- राष्ट्रीयीकृत किंवा नागरी बँका, पतसंस्थांकडून कर्ज घेतलेल्या सभासदांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा तसेच प्राथमिक विकास सेवा सहकारी संस्थेच्या सभासदांचे 8 अ व सातबारा उतार्‍यावरील सामायिक क्षेत्रास व्यक्गित हिस्सेदारीप्रमाणे जिल्हा सहकारी बँकेकडून लवकरच कर्ज वितरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक करण जयंत ससाणे यांनी दिली.

- Advertisement -

जिल्ह्यातील प्राथमिक सेवा संस्थेच्या सभासदांनी जिल्हा बँकेकडून घेतलेले कर्ज त्या व्यतिरिक्त इतर राष्ट्रीयीकृत किंवा नागरी बँका, पतसंस्थांकडून कर्ज घेत असल्याचे दिसून आले आहे. व त्या बँकांची किंवा पतसंस्थांची नावे सदर सभासदांच्या सातबारा उत्तार्‍यावर इतर हक्कात आलेली आहेत. याचा परिणाम सभासद दिवसेंदिवस अधिकाधिक कर्जबाजारी होत जाऊन त्याचा अनिष्ट परिणाम जिल्हा बँकेच्या वसुलीवर होत आहे. परिणाम जिल्हा बँकेने सेवा सोसायटीमार्फत दिलेले कर्ज सुरक्षित रहात नाही.

विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अनेक सभासदांकडे इतर राष्ट्रीयीकृत नागरी बँका, पतसंस्थांचे सातबारा उतार्‍यावर इतर हक्कात बोजे असतात. असे सभासद प्राथमिक विकास सेवा सोसायटीमार्फत जिल्हा बँकेकडे पिक कर्जाची मागणी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार जिल्हा बँकेने सदर सभासदांकरिता पीक कर्ज देण्याचे धोरण ठरविले आहे. परंतु ज्या सभासदांकडे इतर राष्ट्रीयीकृत बँकांचे पीक कर्ज सोडून अन्य कर्ज आहे, अशाच सभासदांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचेही करण ससाणे यांनी सांगितले.

तसेच प्राथमिक विकास सेवा संस्थेच्या काही सभासदांच्या 8 अ ला सामाईक क्षेत्र म्हणून व सातबाराला कब्जेदार सदरी (मालकी हक्क) सामाईक क्षेत्र म्हणून एक किंवा त्यापेक्षा अधिक गटाची नोंद असते किंवा एका गावातील कार्यक्षेत्रात एकापेक्षा जास्त जमिनीच्या खात्यांची तलाठी दप्तरी नोंद असते. त्यापैकी काही गटातील क्षेत्र व्यक्तिगत मालकीचे असते व काही गटातील क्षेत्र सामायिक मालकीचे असते. सामाईक मालकीच्या क्षेत्रातील जमिनीच्या क्षेत्राची विभागणी जमीन वाटप अगर पैसेवारी सातबारावर नसते. म्हणजेच सातबाराला त्या गटात एकापेक्षा अधिक व्यक्तीच्या नावाने कब्जेदार सदरी सामायिक क्षेत्र म्हणून नोंद असते.

सदरचे क्षेत्र हे वडिलोपार्जित जमीन वारसाची नोंद झाल्यामुळे, एकत्रित खरेदीमुळे, शेती महामंडळाकडून वारसा हक्कानुसार शेतजमीन परत मिळाल्यामुळे तसेच शासकीय विविध योजनेअंतर्गत शासनाकडून वहितीस मिळाल्यामुळे किंवा इतर कारणामुळे सभासदांच्या 8 अ व सातबाराला सामायिक क्षेत्र म्हणून नोंद असते. असे सर्व सभासद कर्ज पुरवठ्यापासून वंचित राहत असल्याचे निदर्शनास आल्याने त्या सभासदांना त्यांचे क्षेत्रावरील हिस्सेवारीप्रमाणे अल्पमुदत कर्ज वितरण करण्याचे जिल्हा बँकेने ठरविले आहे; परंतु अशा सभासदांना ई-करार करुन देणे तसेच तहसीलदार यांच्यासमोर प्रतिज्ञापत्र करुन देणे व सामाईक उतार्‍यावरील सर्व खातेदारांची संमती देणे बंधनकारक राहणार असल्याचे करण ससाणे यांनी सांगितले.

शेतकरी सभासदांना अशा प्रकारचे पीककर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, ना. शंकरराव गडाख, ना. प्राजक्त तनपुरे, खा. सदाशिव लोखंडे, आ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे यांच्या विशेष प्रयत्नाने तसेच जिल्हा बँकेचे चेअरमन, व्हा. चेअरमन व सर्व संचालक यांच्या सहकार्याने हे शक्य झाले असल्याचे करण ससाणे यांनी सांगितले.

याप्रसंगी ज्येष्ठ नेते जी. के. पाटील, इंद्रनाथ थोरात, बाजार समितीचे माजी सभापती सचिन गुजर, जि. प. सदस्य बाबासाहेब दिघे, मंगलताई पवार, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अरुण नाईक, पं. स. सदस्य, विजय शिंदे, वंदनाताई मुरकुटे यांनी जिल्हा बँकेचे आभार मानले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या