पाच जणांच्या पलायनामागे सहाव्या आरोपीचा हात ?
Featured

पाच जणांच्या पलायनामागे सहाव्या आरोपीचा हात ?

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) – कर्जत उपकारागृहातून पाच आरोपींनी पलायन केल्याची घटना रविवारी (दि. 9) रात्री घडली. एकाच वेळी पाच आरोपी पळून जाणारी ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे खडबडून जागे झालेल्या जिल्हा पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी सात पथके रवाना केली आहेत. आरोपींचा शोध कसून सुरू आहे. बराकीमध्ये एकूण सहा आरोपी होते. यापैकी पाच आरोपी पळाले असले तरी, पाच जणांना पळवून लावण्यात सहावा आरोपीचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे खात्रिलायक सूत्रांनी सांगितले.

कर्जत उपकारागृह खूप वर्षे जुने आहे. यापूर्वी किरकोळ काम वगळता या कारागृहाचे मोठे काम करण्यात आलेले नाही. आरोपींनी पलायन करण्यासाठी सुट्टीचा दिवस निवडला. तशी तयारी त्यांनी पूर्व नियोजित केली असावी. पळून जाण्यासाठी कटरच्या साहाय्याने गज कापून अवघ्या काही मिनिटांत पलायन केले. गज कापण्यासाठी आरोपींना कटर कसे उपलब्ध झाले, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. पाच जण पळाले पण सहावा आरोपी पळाला नाही.

पाच जणांना पळवून लावण्यात त्याचा हात असावा, अशी शंका उपस्थित होत आहे. उपकारागृहात आरोपींच्या रक्षणासाठी चार पोलीस कर्मचारी तैनात होते. मग पाच आरोपी पळून जात असताना एकाही कर्मचार्‍याच्या लक्षात हा प्रकार आला नसावा का? उपकारागृहात सीसीटीव्ही कॅमेरे होते. आरोपींची हालचाल संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांच्या लक्षात येणे आवश्यक होते. आरोपींना गज कापण्यासाठी कटर उपलब्ध कसे झाले? पाच जण पळून जात असताना सहावा आरोपींने त्यांना मदत केली असावी? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

उपकारागृहात चार बराकी आहे. यामध्ये 27 आरोपींची क्षमता असली तरी प्रत्यक्षात 27 पेक्षा जास्त आरोपी येथे आहेत. ज्या बराकीतून आरोपी पळाले त्या बराकीमध्ये एकूण सहा आरोपी होते. बराकीच्या एका कोपर्‍यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे. आरोपींना गज कापण्यासाठी बाहेरून कोणीतरी कटर पुरविले हे उघड सत्य आहे. न पळालेला सहावा आरोपी पोलीस कर्मचारी आहे. तो खुनाच्या गुन्ह्यात अटकेत आहे.

पाच जणांना पळून जाण्यामागे या पोलीस कर्मचार्‍याच्या हात असावा अशी शंका आहे. तसा या खुनी पोलीस कर्मचार्‍याची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे. यामुळे त्याने या पाच गुन्हेगारांना पळवून लावण्यात मदत केली असावी, अशी शंका पोलिसांना आहे. पोलीस त्या दृष्टीने तपास करत आहेत. आरोपींनी पलायन केले असले तरी आता त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस प्रयत्न करत आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोर्जे यावर लक्ष ठेवून आहेत. प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील कर्जतला तळ ठोकून आहे.

पूर्वनियोजित कट
आरोपींनी पलायन करण्यासाठी सुट्टीचा दिवस निवडला असला तरी पळून जाण्यासाठी त्यांनी पूर्व नियोजन केले असावे. यासाठी त्यांना बाहेरून कटर उपलब्ध झाले, हा त्याचाच एक भाग आहे. यानंतर त्यांनी कटरच्या साहाय्याने गजकापणी केली. गज जाड असल्याने गज कापणीची प्रक्रिया काही वेळामध्ये होणे शक्य नाही. यामुळे आधी एकदोन दिवस गज कापण्याची प्रक्रिया सुरू केली असावी. गज कापत असताना सीसीटीव्हीमध्ये दिसणार नाही याची काळजीपणा आरोपींनी घेतली आहे. यामुळे हा कट पूर्वनियोजित असावा. पोलीस तपासामध्ये अनेक गोष्टीचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

Deshdoot
www.deshdoot.com