कापुस कैफियत आंदोलन स्थगित

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर – राज्यात कापुस खरेदी सुरु करावी व इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने सुरू केलेले मंत्र्यांचे फोन डाउन करण्याचे कापुस कैफियत आंदोलन स्थगित केले असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

सीसीआय मार्फत सुरु असलेली कापुस खरेदी २० मार्चपासुन बंद करण्यात आली होती. शेतकर्‍यांच्या घरात कापुस आहे व पावसाळा तोंडावर आल्यामुळे शेतकरी संघटनेने आंदोलनाचा पावित्रा घेतला. लॉक डाउनमध्ये रस्त्यावरचे आंदोलन शक्य नसल्यामुळे घरीच राहुन सर्व मंत्री , खासदार, आमदार यांना फोन करुन कापुस कैफियत आंदोलन करण्याचा निर्णय शेतकरी संघटनेने घेतला.

३० एप्रिल पासुन सुरु झालेल्या या आंदोलनात संघटनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी लोक प्रतिनिधींना फोन केले. बर्‍याच मंत्र्यांनी फोन बंद ठेवले, फोन उचलले नाही किंवा उडवा उडवीची उत्तरे दिली. राज्याचे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मात्र सर्व कार्यकर्ते व शेतकर्‍यांचे फोन उचलले व अतिशय संयमाने उत्तरे दिली. आवश्यक हालचाली करुन त्यांच्या अख्त्यारित असलेले प्रश्न सोडवले. त्यांच्या या जवाबदार वागण्याबद्दल शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी ३ मे रोजी फोन करुन आभार मानले.

रोज 20 गाड्या स्विकारण्याची मर्यादा हटविण्यात आली व सर्व कापुस खरेदी केंद्र सुरु करण्यात आले असले तरी सर्व प्रतीचा कापुस खरेदी करण्याबाबत अद्याप केंद्र शासनाचा निर्णय झालेला नाही त्यासाठी केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्रसिंग तोमर व केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी तसेच केंद्रीय परिवहनमंत्री नितिन गडकरी यांना, सीसीआयने निश्चित केलेल्या एफएक्यूच्या सर्व ग्रेडमध्ये खरेदी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सर्व प्रतिचा कापुस खरेदी करण्याचा निर्णय तातडीने न घेतल्यास केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी ११ मे रोजी प्रत्येक शेतकरी एक किलो कापुस जाळुन केंद्र शासनाचा निषेध करणार आहे असा इशारा घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *