कल्याण रोड परिसरात भरदिवसा तीन फ्लॅट फोडले
Featured

कल्याण रोड परिसरात भरदिवसा तीन फ्लॅट फोडले

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरात चोर्‍या, घरफोड्यांचे सत्र सुरूच असून सोमवारी दुपारी कल्याण रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी तीन फ्लॅटमध्ये डल्ला मारला. तसेच, चार फ्लॅटचे बाहेरून कडीकोयंडे तोडले. यामध्ये 46 हजारांची रोकड, सोन्याचे दागिने असा ऐवज चोरीला गेला आहे. दिवसा घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. रात्री उशीरापर्यंत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद झाली नव्हती.

तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतील सावेडी, बालिकाश्रम रोड, कल्याण रोड चोरट्यांनी टार्गेट केला आहे. मोबाईल, दुचाकी चोरीबरोबरच घरफोड्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. सोमवारी दुपारी कल्याण रोडवरील गणेशनगर भागात असलेल्या रायगड हाईट्समध्ये चोरट्यांनी प्रवेश केला. दुपारची वेळ असल्याने परिसरात शांतता होती.

यावेळी चोरट्यांनी तीन फ्लॉट फोडून एकातून सहा, दुसर्‍यातून दहा तर, तिसर्‍या फ्लॅटमधून तीस हजारांची रोकड चोरली. तर, एका फ्लॅटमधून गंठण चोरले आहे. तसेच, चोरट्यांनी रायगड हाईट्सममधील इतर चार फ्लॅट फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्याने चोरट्यांनी धूम ठोकली.

दिवसा फ्लॅट फोडल्याने गणेशनगर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीची माहिती तोफखाना पोलिसांना देण्यात आली. तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हारुण मुलाणी, सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंगळे यांनी डॉग स्कॉड पथकासह घटनास्थळी भेट पाहणी केली. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत तोफखाना पोलीस ठाण्यात कोणताच गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Deshdoot
www.deshdoot.com