Saturday, April 27, 2024
Homeनगरकाकडी विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या समस्या आजही प्रलंबित

काकडी विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या समस्या आजही प्रलंबित

आ. आशुतोष काळे यांनी महाराष्ट्र विमान विकास कंपनीच्या कार्यकारी संचालकांबरोबर केली चर्चा

कोपरगाव (प्रतिनिधी)- जगभरातील साईभक्तांना शिर्डीला येणे सोयीस्कर व्हावे व साईभक्तांचा वेळ वाचावा या उद्देशातून माजी आ. अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे विमानतळ उभारण्यात आले. दोन वर्षापूर्वी या विमानतळाचे लोकार्पण झाले.

- Advertisement -

मात्र लोकार्पण झाल्यापासून या विमानतळावरून विमानांचे उड्डाणासाठी सातत्याने अनेक अडचणी येत असून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या आजही प्रलंबित असल्यामुळे आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच महाराष्ट्र विमान विकास कंपनीचे कार्यकारी संचालक अनिल पाटील यांची भेट घेवून त्यांच्याशी काकडी विमानतळाच्या विविध अडचणीबाबत चर्चा केली.

या चर्चेदरम्यान आ. आशुतोष काळे यांनी कार्यकारी संचालक अनिल पाटील यांच्याशी चर्चा करतांना काकडी विमानतळाच्या विविध समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. यामध्ये काकडी विमानतळावर डीव्हिओआर अर्थात कमी दृष्यमानतेवर मात करणारी डॉपलर व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी ओमनी रेंज ही सेवा बंद असल्यामुळे नाईट लँडिंग सुविधा बंद असल्यामुळे साई भक्तांची गैरसोय होत असून टॅक्सी चालकांचे देखील नुकसान होत आहे. काकडी विमानतळावर स्पाईस, इंडिगो यासारख्या खाजगी कंपन्यांची विमानसेवा सुरू असून या कंपन्यांनी प्रकल्पग्रस्तांचा विचार करून त्यांना नोकरी देणे गरजेचे असतांना बाहेरील व्यक्तींना नोकरी दिली जात आहे.

कोणताही प्रकल्प पूर्ण होईपर्यंत प्रकल्पग्रस्तांना कृषीमजुरी देणे बंधनकारक आहे. काकडी विमानतळ प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा, असा करार असतांना प्रत्यक्षात हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी नऊ वर्षाचा कालावधी लागला आहे. विमान प्राधिकरणाने मात्र प्रकल्पग्रस्तांना प्रत्यक्षात तीनच वर्षाची कृषीमजुरी दिली असून विमान प्राधिकरणाने प्रकल्पग्रस्तांना अजून सहा वर्षाची कृषीमजुरी द्यावी. विमान प्राधिकरणाकडून काकडी गावाला जोडणारे रस्ते डांबरीकरण करण्याचे मान्य केलेले असताना देखील केवळ शिर्डी-काकडी या रस्त्यांचे डांबरीकरण केलेले आहे.

काकडी जुन्या गावठाणावरील भूमिगत गटारी व अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. काकडी गावचा पाणीप्रश्न आजपर्यंत सुटलेला नाही. विमान प्राधिकरणाने प्रकल्पग्रस्त कुटुंबातील सदस्याला नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अजूनही अनेक प्रकल्पग्रस्त कुटुंबातील सदस्यांना नोकरीत सामावून घेतले नसून काही प्रकल्पग्रस्त कुटुंबातील मात्र दोन ते चार सदस्यांना नोकरी देण्यात आली आहे.

विमान प्राधिकरणाने असे न करता प्रकल्पग्रस्त कुटुंबातील सदस्यांना नोकरीमध्ये सामावून घेण्याबाबत तसेच काकडी विमानतळाच्या विविध अडचणीबाबत आ.आशुतोष काळे यांनी महाराष्ट्र विमान विकास कंपनीचे कार्यकारी संचालक अनिल पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली. झालेल्या बैठकीत या अडचणी तातडीने सोडविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या