कैलास गिरवले मृत्यूप्रकरणी 16 पोलिसांना नोटिसा

कैलास गिरवले मृत्यूप्रकरणी 16 पोलिसांना नोटिसा

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगरसेवक कैलास गिरवले यांच्या मृत्यूप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या 16 जणांना औरंगाबाद खंडपीठाने नोटिसा बाजवल्या आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 मार्चला होणार आहे. गिरवले यांचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला होता.

या प्रकरणी सखोल तपास व्हावा व संबंधित दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी त्यांच्या पत्नी निर्मला कैलास गिरवले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या क्रिमीनल रिट पिटीशनवर न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती एम. जी. शेवाळकर यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी (दि. 20) सुनावणी झाली. न्यायालयाने संबंधित प्रकरणातील स्थानिक गुन्हे शाखेचे नगरचे पोलीस निरीक्षक यांच्यासह 16 पोलीस कर्मचार्‍यांना आपले म्हणणे सादर करण्यासंदर्भात नोटिसा जारी केल्या आहेत.

तसेच, राज्य गुन्हे अन्वेषणने (सीआयडी) आजपर्यंत काय तपास केला, याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून पुढील सुनावणी 27 मार्चला होणार आहे. या सुनावणीच्या तारखेपर्यंत सीआयडीने आपला अहवाल सादर करावयाचा आहे. निर्मला गिरवले यांच्यातर्फे अ‍ॅड. नितीन गवारे पाटील यांनी बाजू मांडली.

पोलिसांच्या मारहाणीतच कैलास गिरवले यांचा मृत्यू झाला, अशा आशयाची तक्रार त्यांच्या पत्नी निर्मला गिरवले यांनी आपल्या याचिकेत केलेली असून त्या संदर्भात संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. न्यायालयाने संबंधित प्रकरणात वरील आदेश केला असल्याची माहिती अ‍ॅड. गवारे यांनी दिली.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com