जामखेडच्या प्रत्येक नागरिकांवर ‘वॉच’
Featured

जामखेडच्या प्रत्येक नागरिकांवर ‘वॉच’

Sarvmat Digital

वॉर्डनिहाय कर्मचार्‍यांची नियुक्ती, मदतीला शिक्षकही

जामखेड (तालुका प्रतिनिधी)- जामखेड शहरातील 21 वॉर्डमध्ये तहसीलदार यांच्या सुचनेनुसार प्रत्येक वॉर्डाची जबाबदारी एका कर्मचार्‍याकडे दिली असून, ते तेथे मुख्याधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. त्यांच्या मदतीला शिक्षकांसह इतर कर्मचारी असतील. एका वॉर्डात चार कर्मचारी ठाण मांडून बसणार असून, तेथील नागरिकांच्या प्रत्येक हालचालीवर प्रशासनाचा वॉच राहणार आहे.

हॉटस्पॉट म्हणून घोषित केलेल्या जामखेडसाठी आ.रोहित पवार आणि प्रशासन नियोजन करत असून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा आरोग्याधिकारी संदीप सांगळे, पोलीस उपअधीक्षक संजय सावंत वारंवार बैठका घेऊन याचा आढावा घेत आहेत.

तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या नेतृत्वाखाली जामखेडसाठी आता खबरदारीच्या उपाययोजना करताना त्यानुसार जबाबदार्‍या देण्यात आल्या आहेत. जामखेड शहरातील करोना साखळी तोडण्यासाठी प्रसंगी कठोर भूमिका घेण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांचे हाल होऊ नयेत म्हणून त्यांच्यासाठी नियंत्रणकक्ष कार्यरत आहे. त्यांच्या मागणीच्या नोंदी घेऊन त्याप्रमाणे त्यांना जीवनावश्यक सुविधा पुरवण्यात येत आहेत. करोना बाधितांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी व करोना विरोधात लढण्यासाठी तालुक्यातील सर्वच प्रशासनाने कंबर कसली आहे.

जामखेड शहरात लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक करोना रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर करोना प्रसाराची साखळी तोडून फैलाव रोखण्यासाठी सर्वाधिक चाचण्या घेण्यात येत आहेत. जे संशयित घाबरत होते, नाव सांगत नव्हते अशा लोकांचा प्रशासनाच्या मदतीने शोध घेऊन त्यांचीही चाचणी करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. करोना बाधितांच्या संपर्कात आलेल्यांच्या चाचण्या घेण्याबरोबरच त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवले जात आहे.

कर्जत-जामखेडच्या सर्वच प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी अशा करोना वॉरीअर्सना आ. रोहित पवार यांनी मास्क, सॅनीटायझर आदी अत्यावश्यक साधने उपलब्ध करून दिली आहेत. मतदारसंघातील प्रत्येक गावात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली आहे.

वेगळ्या पॅटर्नची गरज ऩाही : आ. पवार
प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे करोनाचा इतर भागात फैलाव झाला नाही. चाचण्या, शोधमोहीम, सुरक्षितता हे सर्व प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. रुग्णांची संख्या वाढली असली तरी जेवढे आपण मुळाशी जाऊ तेवढा इतरांना धोका होणार नाही. आपल्याला प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे. कर्जत-जामखेडला कोणत्याही वेगळ्या पॅटर्नची गरज नाही. पहिल्यापासूनच योग्य नियोजन सुरू आहे, असे आ. रोहित पवार यांनी सांगितले. माजी मंत्री राम शिंदे यांनी जामखेड येथे भिलवाडा पॅटर्न राबविण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर आ. पवार यांचे मत महत्त्वाचे मानले जाते.

Deshdoot
www.deshdoot.com