जामखेड : फक्राबादच्या रूग्णाचा अहवाल निगेटिव्ह

जामखेड (तालुका प्रतिनिधी) – कोरोनाने सध्या जगभरात थैमान घातले असून जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथील एक व्यक्ती कोरोना संशयित आसल्याची चर्चा तालुक्यात होती. मात्र या कोरोना संशयिताचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती समोर आल्याने जामखेडकरांनी हुश्श झाले आहेत.

गुरुवारी संध्याकाळी जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे एक व्यक्ती परदेशातून आपल्या गावी आली होती. मात्र त्या व्यक्तीला कोरोना झाली आसल्याची अफवा जामखेड शहरसह तालुक्यात पसरली होती. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात घबराटीचे वातावरण होते. परदेशातून आलेल्या व्यक्तीचे घशातील स्त्राव घेऊन कंपलसरी तपासणी करण्याचे आदेश आहेत. याच अनुषंगाने या व्यक्तीला 19 रोजी तपासणीसाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात नेले होते. हा संशयित रुग्ण अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात आहे. त्यांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे व तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी पत्रकारांना दिली.

जामखेड येथील देखील एक विद्यार्थी काही दिवसांपूर्वी चीनहून आला होता. त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना तपासणीसाठी पुणे येथील ‘एनआयव्ही’कडे पाठवला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांनी दिली. त्याचा अहवाल लवकरच कळेल, मात्र तो ठणठणीत असल्याचे त्यांनी सांगितले.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *