जामखेडमध्ये पोलीस, पत्रकार उतरले रस्त्यावर

jalgaon-digital
1 Min Read

तहसीलदार, आरोग्य अधिकारी यांनी शहरात फिरून केली दुकाने व बाजार बंद

जामखेड (तालुका प्रतिनिधी)- जामखेड शहरासह तालुक्यात कोरोना या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले. त्याच धर्तीवर जामखेड येथे भरणारा शनिवारचा आठवडी बाजार रद्द करण्याबाबत नगर परिषदेने आवाहन केले होते. मात्र, या आवाहनाकडे दुर्लक्ष करून व्यापार्‍यांनी आठवडी बाजार भरविला होता त्यानंतर तहसीलदार विशाल नाईकवडे, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुनील बोराडे व जामखेड तालुक्यातील पत्रकारांनी एकत्र येऊन ठोस पाऊल उचलत शहरातील विविध भागात फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन करून बाजार ,दुकाने बंद केली.

कोरोना विषाणूची बाधा तसेच प्रसार होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जामखेड नगरपरिषदेने शहरातील दर शनिवारी भरण्यात येणारा आठवडे बाजार दि 31 पर्यंत बंद ठेवण्याचा लेखी आदेश काढला होता. आदेश असतानाही जामखेडचा आठवडे बाजार चालु असल्याने निदर्शनात येताच पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील,यांनी तातडीने जामखेड पोलीस स्टेशनमध्ये तहसीलदार नाईकवाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ बोराडे, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी व जामखेड मधील पत्रकार यांच्या समवेत बैठक घेऊन नागरिकांना बंद पाळण्याचे आवाहन केले त्यानंतर तातडीने जामखेड तालुक्यातील पत्रकारांच्या समवेत शहरातील बाजारातळ ,तपनेश्वर रोड ,चिकन मार्केट,खर्डा चौक ,जयहिंद चौक, खर्डा चौकात फेरफटका मारून गर्दी होत असलेली दुकाने बंद केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *