इंदोरीकरांच्या ‘व्हिडिओ’ने खळबळ
Featured

इंदोरीकरांच्या ‘व्हिडिओ’ने खळबळ

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगरचे प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या एका किर्तनात गर्भलिंग निदान बाबत वक्तव्य केल्याचा मजकूर आणि त्याबाबतचा ‘व्हिडिओ’ व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

हा व्हिडिओ खरा की त्यात छेडछाड करण्यात आली याबाबत चाहत्यांमध्ये शंका उपस्थित केली जात आहे. हा ‘व्हिडिओ’ विविध वेबसाईट आणि सोशल मीडियावर ‘व्हायरल’ करण्यात आल्याने याबाबत जोरदार चर्चा सुरू होती.

निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी त्यांच्या किर्तनातून अनेकदा सामाजिक, राजकीय क्षेत्रांमधील ज्वलंत विषयावर कीर्तन करुन अनेकांची मनं जिंकली आहेत.

मात्र व्हायलर झालेल्या व्हिडिओत ‘सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असे वक्तव्य केलेले आहे. यावरून रंगतदार चर्चा झडू लागली आहे.

याप्रकरणी कुणाकडे पुरावे असल्यास ते द्यावेत. हे पुरावे दिल्यानंतरच त्याची सत्यता सायबर सेलकडून पडताळून पाहिली जाईल. याबाबत सायबर सेलने स्पष्ट अभिप्राय दिल्यानंतर याबाबतची योग्य ती कार्यवाही केली जाईल. आजतरी याबाबत काही पुरावे उपलब्ध नाहीत. याबाबत गुन्हा दाखल करण्यासंदर्भातला कोणताही निर्णय झालेला नाही.
– प्रदीप मुरंबीकर, जिल्हा शल्य चिकित्सक तथा जिल्हा समुचित अधिकारी, अहमदनगर

महाराजांच्या भूमिकेकडे लक्ष
याप्रकरणी इंदोरीकर महाराज यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तो होऊ शकला नाही. त्यामुळे आता ते काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com