26 वर्षे जनतेला हसविले, माझ्यावरच रडण्याची वेळ

26 वर्षे जनतेला हसविले, माझ्यावरच रडण्याची वेळ

निवृत्ती महाराज इंदोरीकर यांची खंत

अहमदनगर (वार्ताहर) – तंदरुस्त जीवन जगण्यासाठी हसणे महत्त्वाचे आहे. त्यासाठीच आजपर्यंत 26 वर्षे कीर्तनसेवेच्या माध्यमातून जनतेला हसवीत आलो. पण आज मला रडावे लागतेय, अशी खंत हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी व्यक्त केली.

इंदोरीकर महाराज म्हणाले, निसर्ग नियमानुसार अनेक बाबी सत्य व निश्चित आहेत. पण ज्या लोकांचा देवावर आणि ग्रंथांवर विश्वास नाही त्यांना हे अमान्य आहे. पण त्याला कोण काय करणार? कीर्तनासाठी बीड व अहमदनगर जिल्ह्यांतील प्रंचड जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी महाराजांनी सविस्तर प्रवचनाऐवजी थोडक्यात आटोपते घेतले.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाबासाहेब गुंजाळ यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला माजी आमदार शिवाजी कर्डिले, राहुल जगताप, साहेबराव दरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष संपतराव म्हस्के, बन्सीभाऊ म्हस्के, बाजार समितिचे आजी-माजी संचालक उपस्थित होते.

इंदोरीकर महाराजांना तृप्ती देसाई यांची नोटीस

अहमदनगर (प्रतिनिधी)- वादाच्या भोवर्‍यात सापडलेले इंदोरीकर महाराज यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी इंदोरीकर महाराजांना वकिलामार्फत नोटीस पाठविली आहे. दरम्यान, याआधी देसाई यांनी इंदोरीकरांविरुद्ध पोलिसांत तक्रारही दिलेली आहे.

तृप्ती देसाई यांनी इंदोरीकर महाराजांना अ‍ॅड. मिलिंद पवार यांच्यामार्फत नोटीस पाठविली आहे. या नोटिशीला 10 दिवसांत उत्तर न दिल्यास थेट न्यायालयात त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात येईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले आहे. इंदोरीकरांनी तमाम महिलांची माफी मागायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. इंदोरीकर महाराजांच्या संगमनेरमधील ओझर बुद्रूक येथील पत्त्यावर ही नोटीस पाठविण्यात आली आहे.

इंदोरीकरांच्या कीर्तनातून सातत्याने महिलांचा अपमान केला जातो. यापुढे महिलांचा अपमान होईल, अशी वक्तव्ये मी करणार नाही, असे कुठेही इंदोरीकर महाराजांनी अद्याप जाहीरपणे सांगितलेले नाही. त्यामुळेच त्यांच्याविरुद्ध महिलांचा अपमान केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आम्ही केली आहे.

ही मागणी आम्ही लावून धरली तेव्हा त्यांच्या समर्थकांकडून आमचं चारित्र्यहनन करणारी भाषा वापरण्यात आली. आम्हाला अश्लील शिविगाळ करण्यात आली. कापून टाकण्याची भाषाही केली गेली. म्हणूनच समस्त महिलांची त्यांनी माफी मागायला हवी. यापुढे अशी कोणतीही वक्तव्ये करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट करायला हवे, असे देसाई यांनी सांगितले.

अंनिस, तृप्ती देसाई यांनी मर्यादेत राहवे

पत्रकार परिषदेत राष्ट्रीय वारकरी परिषदेची भूमिका

पुणे (प्रतिनिधी)- इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून एकीकडे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, म्हणून काही संघटना पुढाकार घेत आहेत तर दुसरीकडे त्यांचे समर्थकही पुढे येऊन त्यांची पाठराखण करत आहेत. आता या वादात राष्ट्रीय वारकरी परिषदेने उडी घेतली असून त्यांनी इंदोरीकर यांनी दिलगिरी व्यक्त केल्यावर विषय थांबविण्याची मागणी केली आहे. इतकंच नाही तर अंनिस आणि तृप्ती देसाई यांनी त्यांच्या मर्यादेत राहावे, असेही परिषदेने म्हटले आहे.

वादग्रस्त विधानामुळे इंदोरीकर महाराज काही दिवसांपासून वादाच्या भोवर्‍यात आहेत. त्यांच्या वक्तव्यावर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप नोंदविला आहे. मात्र दुसर्‍या बाजूला इंदोरीकर यांच्या समर्थनार्थही अनेक राजकीय नेत्यांसह महिलाही पुढाकार घेत आहेत. आता याच वादाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राष्ट्रीय वारकरी परिषदेने पत्रकार परिषद घेतली.

याबाबत महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या कोकण प्रांताचे अध्यक्ष भगवान कोकरे महाराज म्हणाले, इंदोरीकर महाराजांनी तळागाळातल्या वर्गात जाऊन समाज प्रबोधन, समाजसेवा केली. त्यामुळे आता जी काही लोकांची नौटंकी सुरु आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्यावरही वाद सुरु ठेवण्यात आला आहे. त्यांच्यासमोर बोलण्याची विरोधकांची योग्यता नाही. आता देसाई आणि अंनिस थांबले नाहीत तर त्यांच्या स्वतःवर दाखल असलेले खटले आधी चालवावेत आणि मग इंदोरीकर महाराजांवर कारवाई व्हावी असेही त्यांनी स्पष्ट केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com