कीर्तन सोडतो, शेतीच करतो !
Featured

कीर्तन सोडतो, शेतीच करतो !

Sarvmat Digital

इंदोरीकर महाराज : सुरक्षेसाठी ‘बाऊन्सर’चा गराडा

बीड/अहमदनगर (प्रतिनिधी) – पुत्रप्राप्तीबाबत मी जे काही बोललो ते काही ग्रंथांमध्ये लिहिलं आहे. मात्र जो काही वाद झाला त्यामुळे मला खूप त्रास झाला, मी उद्विग्न झालो आहे. दोन दिवसांत माझं वजनही कमी झालं आहे. आता एक-दोन दिवस वाट पाहीन. वाद थांबला नाही तर कीर्तन सोडून शेती करेन’असे कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी यू ट्यूबवाले काड्या करतात, असा आरोप केला. दरम्यान, या वादानंतर ते सुरक्षारक्षकांच्या गराड्यात दिसून आले. नगरच्या भिंगार येथे त्यांच्याभोवती ‘बॉउन्सर’चा गराडा होता.

पुत्रप्राप्तीसाठी सम-विषम तिथीचा अवैज्ञानिक फॉर्म्युला कीर्तनातून सांगितल्याने प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तयारी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. या सर्व वादावर इंदोरीकर महाराजांनी शुक्रवारी रात्री बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात झालेल्या एका कीर्तनात भाष्य केले. या कीर्तनाचा व्हिडिओ त्यांचे समर्थक सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत.

इंदुरीकर महाराजांनी संपूर्ण वादाचा ठपका यू ट्यूब चॅनलवर ठेवला आहे. ते म्हणाले, यूट्यूबवाले काड्या करतात. यू ्यूब चॅनलवाल्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु हे चॅनेल संपतील, मी नाही. यूट्यूबवाले आणि कॅमेरावाले माझ्या मागे लागलेत. इंदुरीकर संपवायला निघालेत. मी कशात सापडेना म्हणून मला गुंतवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी आता एका वेगळ्या निर्णयाप्रत आलोय. एखाद-दुसरा दिवस जाऊ द्यायचा. आता लय झालं. फेटा ठेवून द्यायचा. आपली सहन करायची कॅपॅसिटी संपली, असं त्यांनी सांगताच उपस्थित चकीत झाले.

सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असे वादग्रस्त वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी केलं होते. ते यूट्यूबवरून व्हायरल झाले. इंदोरीकर महाराज यांनी केलेले वक्तव्य हे गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात आहे. हे वक्तव्य म्हणजे गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्यानुसार कलम 22 चे उल्लंघन असल्याने पीसीपीएनडीटीच्या सल्लागार समितीने त्यांना नोटीस पाठवत खुलासा मागितला आहे. नोटीस बजावल्यानंतर जर पुरावे आढळले तर गुन्हा दाखल करण्यात येईल, असंही पीसीपीएनडीटीने म्हटले आहे.

विधानावर ठाम ? 

दोन-अडीच तासांच्या कीर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतो. पण मी बोललेलो वाक्य चुकीचं नाही. समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी हे भागवत, ज्ञानेश्वरीतही सांगितलंय. मी म्हणतोय ते खरंय, असं त्यांनी म्हटल्याचं समोर येत आहे. यावरून वाद वाढण्याची शक्यता आहे.

महिला आयोगाकडे तक्रार ?

दरम्यान, इंदोरीकर महाराज यांचे शेकडो व्हिडिओ यू ट्यूबच्या विविध चॅनेलवर उपलब्ध आहेत. त्यात महाराज महिलांबद्दल बरंच काही बोलताना दिसतात. त्यांच्या ‘सम-विषम’ वक्तव्यानंतर त्यांची महिला वर्गावरील टीकाही चर्चेत आली आहे. काहींनी याबाबत महिला आयोगाकडे दाद मागता येईल का, याची चाचपणी सुरू केल्याचे वृत्त आहे. तसे झाल्यास महाराज अधिकच गोत्यात येण्याची चिन्हे आहेत.

अंनिस आक्रमक

उद्या गुन्हा दाखल करणार

पुणे/अहमदनगर (प्रतिनिधी) – महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची खूप मोठी परंपरा आहे. इथे सर्वजण एकमेकांना माउली म्हणून संबोधत एकमेकांच्या पाया पडत असतात. पण निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर महाराज) त्यांच्या कीर्तनातून महिला-मुलींची टिंगल टवाळी करत अपमानस्पद बोलत असतात. आपल्या देशात आधीच मुलींची संख्या कमी असताना इंदोरीकरांनी पुराणातील संदर्भ देत जी गर्भलिंग निदानाची जाहिरात केली आहे ती अत्यंत आक्षेपार्ह आहे, असा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी केला आहे. दरम्यान, त्यांच्यावर गर्भलिंग निदानाच्या या वक्तव्यावर पीसीपीएनडीटी, आयपीसी आणि ड्रग्ज अँड मॅजिक कायद्यांतर्गत सोमवारी (दि.17) ला नगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

गवांदे म्हणाल्या, आपल्या देशात महिला सक्षमीकरणासाठी कठोर कायदे असतानाही त्यांनी अशी जाहिरात केली. मात्र आपला देश हा धर्मग्रंथांवर नाही तर संविधानावर चालतो, हे देशातील प्रत्येक नागरिकाने लक्षात ठेवले पाहिजे आणि या कायद्यांचा आदर केला पाहिजे. मात्र इंदोरीकरांच्या गर्भलिंग निदान चाचणीच्या त्यांच्या या विधानाला त्यांच्या ज्या भक्तांनी समर्थन दिले त्यांच्यावर महाराज हेच संस्कार करतात का? असा प्रश्नही त्यांनी अंनिसच्या वतीने विचारला.

Deshdoot
www.deshdoot.com