इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याचे पडसाद सुरूच
Featured

इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याचे पडसाद सुरूच

Sarvmat Digital

आमदार सुरेश धस यांच्याकडून पाठराखण, वारकरी मंडळ, भाजपा आध्यात्मिक आघाडीचेही समर्थन

अहमदनगर (प्रतिनिधी)- एका कीर्तनात मुला-मुलीच्या जन्मासंदर्भात इंदोरीकर महाराजांनी केलेल्या विधानावरून वादंग सुरू आहे. याचे पडसाद चौथ्या दिवशीही सुरू होते. भाजपचे विधानपरिषदेवरील आमदार सुरेश धस यांनी इंदोरीकर महाराजांवरील वादात उडी घेतली. महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत धसांनी इंदोरीकरांना समर्थन दर्शवलं आहे.

तर इंदोरीकर महाराजांवर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल आखिल भारतीय वारकरी मंडळ, भाजपा आध्यात्मिक आघाडी व धार्मीक संघटनांच्यावतीने निषेध करण्यात आला. महाराजांवर खोटा गुन्हा दाखल केल्यास आदोलन करण्याचा इशारा भाजप अध्यात्मिक आघाडीचे जिल्हा संयोजक बबन मुठे यांनी दिला आहे.

‘पीसीपीएनडीटी’ कायदा आणि महाराज जे बोलले, त्याचा काय संबंध लावला या लोकांनी? मला राज्य सरकारची कीव करावीशी वाटते. या सरकारने इंदुरीकर महाराजांना नोटीस पाठवली आहे. वारकरी संप्रदायाच्या पताका हाती घेऊन संपूर्ण राज्यभर त्यांचं कीर्तन ऐकलं जातं. ते जे बोलले आहेत, ते गुरुचरित्र, भगवद्गीतेमध्ये सप्रमाण सांगितलं आहे असं सुरेश धस म्हणाले.

उठसूट एकाच धर्माच्या मागे लागायचं. आधी शनि मंदिराच्या पाठी, आता इंदुरीकर महाराज, त्या अनुषंगाने जर कोणी काही बोललं, तर राज्य सरकार त्याला नोटीस पाठवणार असेल, तर सरकारच्या अकलेची मला कीव करावीशी वाटते. नोटीसनंतर पुढील कारवाई केली, तर ते अत्यंत दुर्दैवी म्हणावं लागेल. आम्ही शंभर टक्के इंदुरीकर महाराजांच्या पाठिशी आहोत. असं सुरेश धस यांनी स्पष्ट केलं.

स्मिता अष्टेकर-तृप्ती देसाई यांच्यात वाक्युध्द
इंदोरीकर महाराजांवरील वक्तव्यावरून शिवसेनेच्या स्मिता अष्टेकर यांनी तृप्ती देसाई यांच्यावर जोरदार टीका केली. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात त्यांनी देसाई यांना आव्हान दिले होते. देसाई यांनी ते आव्हान स्वीकारले आहे. या दोघींत सुरू झालेले वाक्युध्द काय वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

एकाएकी युट्यूबवरुन डिलीट होऊ लागले ’ते’ व्हिडीओ
इंदोरीकर महाराजांनी युट्यूब चॅनेल चालवणार्‍यांना इशारा दिला. त्यामुळे इंदोरीकर महाराजांचे व्हिडीओ अपलोड करणार्‍या अनेकांनी स्वत:हून व्हिडीओ डिलीट करण्यास सुरुवात केली आहे. इंदोरीकर महाराजांचे हजारो व्हिडीओ युट्यूबवर आहेत. त्यांना मिळालेले व्ह्यूज लाखोंच्या घरात आहेत. इंदोरीकर महाराज किर्तनासाठी महाराष्ट्रभर प्रवास करतात. अनेक जण त्यांच्या किर्तनाचं चित्रिकरण करतात. त्यानंतर ते स्वत:च्या युट्यूबवर अपलोड करून लाखो रुपये कमावतात. व्हायरल झालेल्या याच व्हिडीओंमुळे इंदोरीकर महाराज अडचणीत आले आहेत. त्यामुळेच त्यांनी युट्यूब चॅनेल चालवणार्‍यांना थेट इशारा दिला. याचा धसका घेऊन युट्यूब चॅनेल चालवणार्‍या अनेकांनी इंदोरीकर महाराजांचे व्हिडीओ डिलीट करण्यास सुरुवात केली.

इंदोरीकर महाराजांनी तारतम्य बाळगायला हवे- आदिती तटकरे
सध्या सर्वसामान्यांमध्ये इंदोरीकर महाराजांची मोठी क्रेझ आहे. आपण सर्वजण त्यांचे कीर्तन-प्रवचन ऐकत असतो. प्रसिद्ध व्यक्ती असताना बोलताना तारतम्य बाळगायला हवं. आपले मत सामाजिक किंवा सार्वजनिक व्यासपीठावर मांडत असताना निश्चितपणाने महिलांचा, समाजातील व्यक्तींचा सन्मान राखणं महत्त्वाचं आहे. व्यासपीठावर आपण एकटे म्हणून मत मांडत नसतो. आपल्याकडे लाखो नागरिकांचे लक्ष असते. त्यामुळे या गोष्टींची दक्षता एक सुजान व्यक्ती म्हणून बाळगायला हवी, असं मत राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केलं आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com