सर्वात मोठा विनयार्ड म्युझिक फेस्टिव्हल 1 फेब्रुवारीपासून; ‘सुलाफेस्ट’मध्ये यंदा सलीम-सुलेमान, हॉट चीप
Featured

सर्वात मोठा विनयार्ड म्युझिक फेस्टिव्हल 1 फेब्रुवारीपासून; ‘सुलाफेस्ट’मध्ये यंदा सलीम-सुलेमान, हॉट चीप

Gaurav Pardeshi

नाशिक । प्रतिनिधी

सुला विनयार्डसतर्फे तेराव्या हंगामातील सुला फेस्ट दि. 1 आणि 2 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. भारतातील सर्वात मोठ्या विनयार्ड म्युझिक फेस्टिव्हलमध्ये सहभागी होताना वाईनची चव घेण्याची संधी आणि जगभरातील विख्यात गायक, संगीतकारांसह संगीताच्या तालावर थिरकण्याची संधी या निमित्त मिळणार आहे.

सुलाचे वीस वर्षपूर्तीनिमित्त यंदाचा महोत्सव भव्य आणि सर्वोत्कष्ट ठरणार आहे. दोन दिवसीय महोत्सवात जगभरातील संगीतकार रसिकांच्या भेटीस येणार आहेत. भारतात आपले पहिले सादरीकरण करणार्‍या ब्रिटीश चार्ट टॉपर ‘हॉट चीप’च्या तालावर थिरकण्याची संधी उत्सवात सहभागी होणार्‍यांना मिळणार आहे.

‘रब ने बना दी जोडी’, ‘धूम’, ‘मुझसे शादी करोगी’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांना संगीत दिलेल्या मर्चंट बंधू अर्थात सलीम-सुलेमान यांची जोडी बॉलिवूड तडका लावताना विनयार्डसच्या खुल्या अँफी थिएटरच्या साक्षीने विक्रमी सादरीकरण करणार आहेत. उत्कृष्ट सादरीकरणाच्या यादीत अँफी थिएटर व्यासपीठावर भारतातील पहिले वोकल आणि बीटबॉक्सने बनलेले वोकट्रोनिका यासह जॅस, हिप-हॉप शैलीतील इलेक्ट्रोफाझ (फ्रान्स), लॅटिन, फंक आणि स्विंग म्युझिक वैशिष्ट्य असलेले रुम्बा दे बोदास (इटली), रेगे आणि डान्स हॉल शैलीत माहिर जाह सन अ‍ॅण्ड राईझिंग टाईड (अमेरिका) अशी काही उल्लेखनीय नावे आहेत आणि तुम्ही जर इलेक्ट्रिक टेक्नो बीटस्च्या शोधत असाल तर इलेक्ट्रिक लेन स्टेज तुमचे पुरेपूर मनोरंजन करेल.

येथे डॉक्टर द्रु (जर्मनी), जोनस रॅथस्मन (स्वीडन) यांच्या संगीतरचनांवर मनसोक्त थिरण्याची संधी मिळणार आहे. यासह बोक्सिया (युके), कोहरा (भारत), सशांती (रशिया) यांसह अनेक आंतरराष्ट्रीयस्तरावरील कलावंत आपल्या नावीन्यपूर्ण संगीतरचना सादर करणार आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com