Thursday, April 25, 2024
Homeनगर‘प्रभारी राज’मुळे जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट

‘प्रभारी राज’मुळे जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नऊ महिने आपल्या कामाची छाप पाडणारे पोलीस अधीक्षक ईशू सिंधू पुढील शिक्षणासाठी लंडन येथे गेल्याने अधीक्षकपदाचा कार्यभार सागर पाटील यांच्याकडे आला. यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनामध्ये सध्या प्रभारी राज सुरू असल्याने जिल्ह्यात अवैध धद्यांचा सुळसुळाट झाला आहे. अवैध धंदे करणार्‍यांना आता रान मोकळे झाले असून पोलिसांचे पण सर्व काही मस्त चाललंय, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

नगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत मोठा जिल्हा आहे. जिल्हा मोठा असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठ्या पोलीस कर्मचार्‍यांची गरज आहे. लोकसंख्येच्या मानाने पोलीस बळ अपुरे पडत आहे. गुन्हेगारीच्या बाबतीत जिल्ह्याचा विचार केल्यास अवैध वाळू उपशातून मिळणारा पैसा, यामुळे चंगळवादी प्रवृती वाढत आहे. याचाच परिणाम गुन्हेगारीवर होत आहे. सिंधू यांच्या काळात गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी सर्वांधिक ‘एमपीडीएफ’ कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

अद्यापही काही ‘एमपीडीएफ’ कारवाईचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. सिंधू यांना जाण्यापूर्वी दोन महिने जिल्हातील गुन्हेगारीने डोकेवर काढले, ते थांबण्याचे नाव घेत नाही. प्रभारी पोलीस अधीक्षक यांचा वचक पोलीस प्रशासनानवर नसल्याने हे होत असल्याची चर्चा पोलीस दलातच आहे. सिंधू यांची जळगाव जिल्ह्यातील गाजलेली कारकीर्द नगर जिल्ह्यातील गुन्हेगारीवर वचक निर्माण करणारी होती. पोलीस अधिकार्‍यापासून कर्मचार्‍यापर्यंत त्यांचा वचक होता. यामुळे चुकीच्या मार्गाला जाऊन कोणती गोष्टी करण्याचे अधिकारी, कर्मचार्‍यांचे धाडस होत नव्हते.

सिंधू गेले आणि सर्वांना मोकळे रान झाले. आता काय सर्व धंद्यांचा जिल्हाभर सुळसुळाट झाला आहे. यामुळे गुन्हेगारीत वाढ झाली आहे. मागील काही महिन्यांचा विचार केला तर गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. याच बरोबर वाळूतस्करांनी जिल्हाभर हैदौस घालत तहसीलदार, महसूल पथकाच्या अंगावर डंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सिंधू यांनी वाळूतस्करांना लगाम घालण्यासाठी सर्वांधिक एमपीडीएफ ची कारवाई केली. परंतु, आता वाळूतस्करी जोरात आहे. वाळूतस्करांची मुजोरी वाढण्यामागे पोलिसांशी त्यांचे असलेले अर्थपूर्ण संबंध कारणीभूत असल्याचे बोलले जाते.

वाळू धंद्यात पोलिसांची भागीदारी
जिल्ह्यात मुळा, प्रवरा, गोदावरी, सीना या नदीपात्रांतून खुलेआम वाळूउपसा सुरू आहे. वाळू तस्करांवर कारवाई करणे गरजेचे असताना पोलीस आणि वाळूमाफिया यांचे संबंध असल्याचे व्हायरल व्हिडिओमुळे समोर आले आहेत. वाळूतस्करीच्या व्यवसायात पोलीसच सामील असल्याचे व्हिडिओतून समोर आले. जिल्हात सध्या कुठलाही वाळू ठेका चालू नाही. अवैध वाळू तस्करी रोखण्याची जबाबदारी महसूल आणि पोलिसांवर आहे. मात्र, या धाडी टाकताना काही पोलीस कर्मचार्‍यांनीच भागीदारीत हा व्यवसाय सुरू केल्याची चर्चा आहे. अर्थात ही भागीदारी कुठेही रेकॉर्डवर नसल्याने सिद्ध करणे शक्य नाही. मात्र, ती पोलीस खात्यात लपलेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या