कायदा-सुव्यवस्थेबाबत पोलीस महानिरीक्षकांकडून अल्टिमेटम

कायदा-सुव्यवस्थेबाबत पोलीस महानिरीक्षकांकडून अल्टिमेटम

सात तासांची मॅरेथॉन बैठक

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील बिघाडलेल्या कायदा सुव्यवस्थेवर नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरींग दोर्जे यांनी शनिवारी (दि. 22) जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सात तास जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला. या बैठकीत समोर आलेल्या मुद्यांची चर्चा रंगू लागली असून महानिरीक्षक दोर्जे यांची ही बैठक म्हणजे जिल्ह्यातील पोलीस अधिकार्‍यांना अल्टिमेटम असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

महानिरीक्षक दोर्जे यांनी शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत पोलिसांच्या कामगिरीशी निगडीत गोष्टींचा आढावा घेतला. दोर्जे यांच्या चौफेर आढाव्यामुळे जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची चांगलीच भंबेरी उडाली. त्यात दोन दिवस आधी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या बैठकीत खासदार सदाशिव लोखंडे, माजी मंत्री तथा आ. बबनराव पाचपुते यांनी वाळूतस्करांना पोलीस आणि महसूल अधिकार्‍यांचे मिलीभगत असल्याचा थेट आरोप केला होता. त्यावर दोन्ही विभागाच्या अधिकार्‍यांनी तोंडावर बोट ठेवले होते. यातच शनिवारी विशेष पोलीस महानिरीक्षक दोर्जे यांनी जिल्हा पोलीस दलाची सात तास बैठक घेतली. त्यातही याच मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समजली.

जिल्ह्यात वाळूतस्कारांचे वाढलेले थैमान, वाढते अवैध धंदे, खून, अपहरण, जबरी लूट, गोळीबार, घरफोड्यांचे प्रमाण, कारागृहातून गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे पलायन, त्यांचा शोधात जिल्हा पोलिसांना येत असलेले अपयश आदींचा आढावा दोर्जे यांनी घेतला. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत खून, दरोडा, फसवणूक व महिलांवरील अत्याचाराबाबतचे अनेक गुन्हे प्रलंबित आहेत.

कोणत्या पोलीस ठाणे हद्दीत किती गुन्हे प्रलंबित आहेत, गुन्ह्यांचा तपास का लागत नाही, त्याची कारणे आदींबाबत दोर्जे यांनी विचारणा करत या गुन्ह्याची निर्गती करण्याचे आदेश दिले.

तत्कालीन पोलीस अधीक्षक ईशू सिंधू हे अभ्यासासाठी परदेश दौर्‍यावर गेले आहेत. सिंधू यांनी पोलीस अधीक्षक पदाचा पदभार सोडून अडीच ते तीन महिने उलटले आहेत. त्यामुळे जिल्हा पोलीस दलाचा कारभार हा प्रभारी सुरू आहे. त्यातच वाढत्या गंभीर गुन्ह्यांवर स्थानिक पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांना नियंत्रण मिळवणे कठीण झाल्याचे चित्र आहे. या सर्वांचा आढावा दोर्जे यांनी घेत पोलीस दलाच्या कामगिरीवर त्यांनी एकप्रकारे निराशा व्यक्त केल्याची खात्रिलायक माहिती आहे.

पूर्णवेळ अधीक्षक कधी ?
जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेची दखल विशेष पोलीस महानिरीक्षक दोर्जे यांनी गेल्या पंधरा दिवसांत घेतली आहे. कर्जत तालुक्यातील आरोपीच्या पलायनानंतर आता थेट त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील पोलीस अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी त्यांच्या पद्धतीने सूचना दिल्या. दरम्यान, जिल्ह्याला पूर्णवेळ पोलीस अधीक्षक कधी यावरही चर्चा सुरू आहे. दोर्जे या बैठकीनंतर सरकारकडे पोलीस अधीक्षकांसाठी अहवाल सादर करतील, अशीही चर्चा आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील लवकरात लवकर जिल्ह्याला पोलीस अधीक्षक मिळेल, असे सांगितले आहे. यामुळे आता सर्वांना नव्या अधीक्षकांची प्रतीक्षा आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com