हॉटस्पॉट नेवाशात वस्तू पुरवठा नियोजन कागदावर
Featured

हॉटस्पॉट नेवाशात वस्तू पुरवठा नियोजन कागदावर

Sarvmat Digital

पहिल्या दिवशी विविध अडचणींमुळे पाणी, दूध, औषधे, किराणा वस्तूंचा पुरवठा नाही

नेवासा (तालुका वार्ताहर)- नेवाशात कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्याने नेवासा शहराला हॉटस्पॉट घोषित करुन 13 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 19 एप्रिल रोजी सकाळी 6 या काळात म्हणजे जवळपास 7 दिवस जीवनावश्यक वस्तूंसह लॉकडाऊनची कठोरपणे 100 टक्के अंमलबजावणी सुरु करण्यात आली. लोकांनी घराबाहेर अजिबात पडू नये यासाठी किराणा, पाणी जार, दूध, औषधे वितरणासाठी हेल्पलाईन उपलब्ध करुन क्रमांक जाहीर करण्यात आले. मात्र हे नियोजन केवळ कागदापुरतेच असल्याचे पहिल्याच दिवशी दिसून आले.

सकाळी घरोघर दूध घालण्यासाठी नेमलेल्या एजन्सीच्या व्यक्ती गेल्या असता सकाळी सहा वाजताच नेहमीच्या शेतकर्‍यांनी ग्रामस्थांना दुधाचा पुरवठा केला होता. त्यामुळे त्यांचे दूध तसेच शिल्लक राहिले. पिण्याच्या पाणी जार वाल्यांनाही सकाळी केवळ दोन तासात विविध अडथळे पार करत पाणीपुरवठा करणे शक्य झाले नाही.
किराणा मागणीचे काही फोन हेल्पलाईनला आले मात्र दुकानदाराने पैशाची हमी कोण घेणार? व माल घरपोच करायचा कसा? या अडचणीमुळे किराणा पोहच केला नाही.

औषधांच्याबाबतीतही केवळ एक ऑर्डर मिळाली. मात्र घरपोच औषधे देण्यात त्यांनीही स्वारस्य दाखविले नाही. त्यामुळे ग्रामस्थांना आहे त्या परिस्थितीत अडचणी सहन करत बाहेरच्या बंदोबस्ताच्या धाकाने घरातच बसावे लागले.

प्रशासनाने मोठा गाजावाजा कोणीच घराबाहेर पडू नका. सर्व घरपोच मिळेल चा दावा केला मात्र केवळ कागदावरच्या नियोजनामुळे लोकांना काहीच फायदा झाला नाही.

Deshdoot
www.deshdoot.com