हॉटस्पॉट नेवाशात वस्तू वितरण एजन्सींची संख्या वाढविली
Featured

हॉटस्पॉट नेवाशात वस्तू वितरण एजन्सींची संख्या वाढविली

Sarvmat Digital

नेवास (तालुका वार्ताहर)- आणखी एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्याने हॉटस्पॉट घोषित केलेल्या नेवाशातील नागरिकांना पहिल्या दिवशी जनतेला अत्यावश्यक सेवा मिळण्यासाठी केलेली व्यवस्था फोल ठरल्याबाबत सार्वमतमध्ये काल वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासनाने वस्तू वितरणासाठीच्या एजन्सींमध्ये वाढ केली. त्यामुळे जनतेचा प्रतिसाद वाढला मात्र पेट्रोल डिझेल वरील निर्बंधामुळे या सेवा देणार्‍यांपुढे अद्यापही अडचण आहे.

याबाबत माहिती अशी की, नेवासा शहर 13 एप्रिल रोजी दुपारी 12 पासून ते 19 एप्रिल रोजी सकाळी 6 या काळासाठी हॉटस्पॉट घोषित केले गेले आहे. या काळात जीवनावश्यक वस्तूंसाठी घराबाहेर पडण्यास देखील बंदी घातलेली आहे. या वस्तू नागरिकांना घरपोच मिळण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. मात्र पहिल्या दिवशी विविध अडचणींमुळे या व्यवस्थेचे तिनतेरा वाजले होते. सार्वमतमध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर प्रशासनाने दखल घेवून दूध, औषधे, किराणा आदी आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी एजन्सींच्या संख्येत वाढ केली.

परिणामी मोठ्या संख्येने यासाठी हेल्पलाईनवर नागरिकांचे फोन आले.पेट्रोल व डिझेल पंपावर डॉक्टर, सरकारी वाहने, रुग्णवाहिका यांनाच पेट्रोल देण्याचे आदेश असल्याने घरपोहच सेवा देणार्‍यांपुढे वाहने वापरायची कशी? असा पेच निर्माण झाला आहे. काल बुधवारी शहरातील मेडिकल दुकानांमध्ये सकाळपासून सुमारे 200, किराणा 150 तर भाजीपाल्यासाठी असंख्य ग्राहकांनी या हेल्पलाईनवर संपर्क साधला.

‘आम्ही नेवासकर’ अ‍ॅप
शहरातील नागरिकांना घरपोच सेवेसाठी शिवनेटवर्कच्या माध्यमातून ‘आम्ही नेवासकर’ हे ऍप्लिकेशन आजपासून सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये सुमारे 40 अत्यावश्यक सेवा देणार्‍या एजन्सीज आहेत ग्राहकांना या माध्यमातून त्वरित घरपोहच सेवा मिळणार आहे हे अ‍ॅप डाऊनलोड करुन लाभ घ्यावा.
रुपेश सुराणा तहसीलदार

पेट्रोल देण्याचे आदेश नाहीत…?
मी सकाळी 7 च्या सुमारास पेट्रोल पंपावर गेलो असता दुग्ध व्यावसायिकांना पेट्रोल देण्याचे आदेश आम्हाला नाहीत असे उत्तर मिळाले. – किरण वांढेकर दुग्ध व्यवसायिक

लवकरच निर्णय घेणार
अत्यावश्यक सेवा संबंधी पेट्रोल, डिझेल देण्याच्या बाबतीत सर्व बाबींवर लवकरच निर्णय घेतला जाईल.
-राहुल द्विवेदी जिल्हाधिकारी

19 अहवाल निगेटीव्ह
नेवासा शहरातील कोरोना तपासणीसाठी घेतलेल्या 22 व्यक्तींच्या नमुन्यांपैकी 19 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून ते सर्व निगेटीव्ह आले आहेत. आता उर्वरीत तीन नमुन्यांची प्रतिक्षा केली जात आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com