Friday, April 26, 2024
Homeनगरकरोनामुळे पहिल्यांदाच मशिदी, रस्ते सुनेसुने, घराघरांत नमाज अदा

करोनामुळे पहिल्यांदाच मशिदी, रस्ते सुनेसुने, घराघरांत नमाज अदा

रमजान महिन्याला प्रारंभ

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- सालाबादप्रमाणे मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याला काल मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. परंतु करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रकारच्या बंधनांना सामोरे जावे लागले . दरवर्षी रमजान महिन्यामध्ये पाचही वेळा भक्तांनी फुलून जाणार्‍या मशिदी सध्या बंद आहेत. शासनाने तसेच स्थानिक पोलीस प्रशासन व उलेमा यांनी करोनाच्या भीतीमुळे मशिदीमध्ये लोकांनी एकत्र येऊ नये अशा प्रकारचे आवाहन केल्याने इच्छा असूनही मुस्लिम बांधव मशिदीकडे फिरकले नाहीत. त्यामुळे मशिदींचा परिसर सुनासुना असल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळाले.

- Advertisement -

संध्याकाळी चौकामध्ये फ्रुट खरेदीसाठी होणारी गर्दी सुद्धा काल दिसली नाही. वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट स्टॉल व खाद्य पदार्थांची दुकाने बंदीमुळे लावली गेली नाहीत. त्यामुळे हातावर पोट भरणार्‍या लोकांचे मात्र खूप हाल झाले. संध्याकाळी सर्व लोक आतुरतेने मशिदीवरून अजानची आवाज ऐकण्यासाठी आतूर झाले होते. राज्याच्या गृहमंत्र्यांनी अजानसाठी परवानगी दिलेली असताना सुद्धा स्थानिक प्रशासनाने मात्र जिल्ह्यामध्ये अद्याप परवानगी दिली नसल्याने काल दिवसभरात मशिदीच्या भोंग्यातून अजान होऊ शकली नाही. त्यामुळे दरवर्षी दिसणारे वातावरण मात्र यावर्षी दिसून आलेले नाही.

सध्या घराघरांमध्ये मुस्लिम बांधव नमाज पठण करीत असून त्यामुळे घरातील वातावरण मात्र बदलून गेले आहे. काल संध्याकाळी साडेसात नंतर वॉर्ड नंबर 2 मधील रस्त्यांवर मोठी गर्दी दिसून आली. या गर्दीला पायबंद घालण्यासाठी सायंकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेमध्ये या भागात पोलिसांची गस्त वाढवण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे. तसेच सर्व मुस्लिम बांधवांनी महिनाभर सर्व प्रकारची पथ्ये पाळून करोनाला रोखण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजनांना सहकार्य करण्याचे आवाहन मुस्लिम समाजातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी केले आहे.

फळे स्वस्त, खजूर महाग
दरवर्षीच्या तुलनेत यंदा सर्व प्रकारची फळे स्वस्त आहेत. द्राक्ष 20-25 रूपये किलो, चिकू 15 ते 20 रूपये प्रति किलो मिळत आहे. तरबूज, खरबूज, पेरू, मोसंबीही मुबलक आणि स्वस्तात मिळत आहेत. पण एव्हाना 200-250 रूपये किलोने मिळणारी खजूर 350-400 रूपये प्रति किलो दराने मिळत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या