अन्यथा फासावर लटकून आत्महत्या करू
Featured

अन्यथा फासावर लटकून आत्महत्या करू

Sarvmat Digital

खंडाळा, अरणगाव, शिंदेवाडी येथील शेतकर्‍यांचा निर्वाणीचा इशारा

अहमदनगर (प्रतिनिधी) – खडीक्रशरच्या धुळीमुळे पिकांचे झालेले नुकसान, खडीक्रशरसह डांबर प्लँटच्या प्रदुषणाने धोक्यात आलेले आरोग्य, सुरुंगाच्या स्फोटाने खालवलेली पाणी पातळी व घरांना गेलेले तडे हे गंभीर प्रश्न सुटत नसल्याने नगर तालुक्यातील खंडाळा, अरणगाव तसेच शिंदेवाडी येथील शेतकर्‍यांनी खडाळा-अरणगावच्या शिवरस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. खडी घेऊन जाणार्‍या गाड्या आडवून खडीक्रशरचे काम बंद पाडले. आता तरी लक्ष द्या, ़अन्यथा फासावर लटकून आत्महत्या करू, असा निर्वाणीचा इशारा यावेळी शेतकर्‍यांनी दिला.

बुधवार दि. 5 फेब्रुवारी संतप्त शेतकर्‍यांनी सकाळी आंदोलन केले. सुमारे तीन तास हे आंदोलन चालू होते. या आंदोलनात नारायण पवार, गोविंद लोटके, सतीश पवार, भाऊसाहेब साठे, जगन्नाथ शिंदे, विश्वनाथ खंडागळे, नवनाथ शिंदे, दगडू शिंदे, ललिता शिंदे, छबाबाई साठे, अशोक खंडागळे, बबन शिंदे आदी शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी पोलीस प्रशासनासह सर्कल बी. जे. वाघमारे व अरणगाव तलाठी गावडा यांनी भेट देऊन शेतकर्‍यांशी चर्चा केली. शेतकर्‍यांनी लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा पवित्रा घेतला होता.

भाकपचे अ‍ॅड. सुधीर टोकेकर व जि. प. सदस्य संदेश कार्ले यांनी आंदोलनास पाठिंबा देऊन या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी केली. सर्कल व तलाठी यांनी संपूर्ण भागातील शेतीची पहाणी करुन पंचनामा करुन नुकसान भरपाई मिळवून देण्याचे तर खडीक्रशर चालकांनी मयुरी हॉटेल ते फटाका गोडाऊनचे दोन महिन्यात डांबरीकरण करण्याचे आणि पाणी टाकून क्रशिंग करण्यासह एका खाणीमध्ये एकाच वेळी स्फोट घडवून आणण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

नगर तालुक्यातील खंडाळा व अरणगाव शिवारात दगडखाणीसह 16 खडीक्रशर व चार डांबर प्लँट आहेत. खडीक्रशरच्या फुफाट्याने व डांबर प्लँटच्या धुराने या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या खडीक्रशरलगत असलेल्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, पिकांची नासाडी झालेली आहे. या भागातील शेतकर्‍यांचे कुटुंब शेतीवर अवलंबून असून, या नुकसानीमुळे त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासन व खडीक्रशर चालकांनी सहकार्य करुन चांगल्या पद्धतीने शेती करु द्या, अन्यथा फासावर लटकून आत्महत्या करु, असा संताप यावेळी शेतकर्‍यांनी व्यक्त केला.

वारंवार प्रशासन व खडीक्रशर चालकांना विनंती करुन देखील सर्व नियम धाब्यावर बसवून या भागात गौण खनिजाचे उत्खनन मोठ्या प्रमाणात चालू आहे. दगडखाणीत एकाच वेळी अनेक सुरुंग लावून मोठे स्फोट घडवून आनले जात आहे. सुरुंगाच्या धक्क्यांनाही ग्रामस्थ वैतागले असून, या भागातील पाणी पातळी देखील घटली आहे. फुफाट्याचा त्रास वर्षभर असल्याने दोन्ही हंगामाच्या पिकांचे नुकसान झाले आहे.

शेतीत काम करताना देखील धुळीच्या प्रदुषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. खडीक्रशर चालक धनदांडगे असल्याने त्यांच्या विरोधात आवाज उठविल्यास सर्वसामान्य शेतकर्‍यांना धमकाविण्यात येत असल्याचा गंभीर आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. नासाडी झालेल्या शेतातील पिकांचा पंचनामा करुन शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी, तसेच खडीक्रशरद्वारे उडणार्‍या धुळीचा बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीचे निवेदन सर्कल व तलाठी यांना देण्यात आले. हा प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशार यावेळी देण्यात आला.

Deshdoot
www.deshdoot.com