दर आठवड्याला बीडीओ जनता दरबार
Featured

दर आठवड्याला बीडीओ जनता दरबार

Sarvmat Digital

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे आदेश

मुंबई/अहमदनगर (प्रतिनिधी) – तालुक्यातील जनतेच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्यांच्या पहिल्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता गटविकास अधिकार्‍यांनी पंचायत समिती कार्यालयात बैठक आयोजित करावी असे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या अधिकार्‍यांनी आता जनता दरबार सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

महिन्यांतील प्रत्येक शुक्रवारी होणार्‍या या जनता दरबारात जनतेच्या तक्रारी, गार्‍हाणी, अडचणी सोडविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या जनता दरबारात ग्रामपंचायत तसेच पंचायत समितीमध्ये आलेल्या लेखी तक्रारीतील सर्व तक्रारदारांना सभेपूर्वी आठ दिवस आधी माहिती देण्यात येणार आहे. या दरबारात होणार्‍या कार्यवाहीचा तपशील संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना देण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत.

लोकांना या बैठकीस उपस्थित राहून थेट गटविकास अधिकार्‍यांकडे अडचणी मांडता येणार आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व गटविकास अधिकार्‍यांनी घेतलेल्या या बैठकीच्या माहितीचे संकलन करायचे आहे. ही संकलित माहिती विभागीय आयुक्तांकडे पाठवायची असून, महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या सर्व माहितीचा तपशील ग्रामविकास मंत्री आणि ग्रामविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे सादर करायचा आहे. त्यामुळे राज्यभरात होणार्‍या या बैठकांचे नियंत्रण थेट मंत्री आणि सचिव स्तरावरुन केले जाणार आहे.

जनेतच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार संवेदनशील असून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक तातडीने होण्याच्यादृष्टीने या सूचना देण्यात आल्या आहेत. जनता आणि पंचायत समिती यांच्यामधील संवाद वाढणेही आवश्यक असून या बैठकीच्या माध्यमातून लोकांना ती संधी प्राप्त होऊ शकेल. गटविकास अधिकार्‍यांनी या बैठका चांगल्या प्रकारे घेऊन लोकांच्या अडचणींना प्रतिसाद द्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या उपक्रमाचा मी स्वत: आढावा घेणार असून लोकांनी गटविकास अधिकार्‍यांशी संवाद साधावा, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com