पकडलेल्या गुटख्याविरोधात फिर्याद देण्यासाठी मुहूर्त सापडला

पकडलेल्या गुटख्याविरोधात फिर्याद देण्यासाठी मुहूर्त सापडला

‘सार्वमत’च्या वृत्तानंतर अन्न प्रशासनाच्या अधिकार्‍यांना आली जाग

अहमदनगर (प्रतिनिधी)- लॉकडाऊन काळात जिल्ह्यात सुरू असलेल्या पानमसाला, सुगंधी तंबाखू, गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका महिन्यात सहा ठिकाणी छापे टाकून जप्त केलेला मुद्देमाल संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिला. परंतु, अन्न प्रशासनचे अधिकारी फिर्याद देण्यासाठी येत नसल्याने अवैध गुटखा विक्री करणार्‍याविरोधात गुन्हे दाखल झाले नाही.

‘सार्वमत’ने सोमवारी (दि. 27) ‘पोलिसांनी गुटखा पकडला, पण फिर्यादीच नाही’ असे वृत्त प्रकाशित केल्यानंतर जागे झालेल्या अन्न प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी फिर्याद देण्यास सुरुवात केली आहे. भिंगार पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 28) अन्न सुरक्षा अधिकारी कालिदास शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एक गुन्हा दाखल झाला असला तरी अजून पाच गुन्हे दाखल होणे बाकी आहे.

लॉकडाऊन काळात सर्व उद्योग धंदे बंद आहेत. परंतु, काहींनी याचा गैरफायदा उठविला आहे. महाराष्ट्रात बंदी घातलेल्या पानमसाला, सुगंधी तंबाखू, गुटख्याची विक्री चोरी चुपके विक्री सुरू ठेवली आहे. यामुळे करोना धोका वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या अवैध धंद्यावर छापेमारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील ठिकठिकाणी मशीनच्या सहाय्याने सुगंधी तंबाखूचा वापर करून तयार होणारा मावा, गुटखा गुन्हे शाखेने छापे टाकून जप्त केला.

पारनेर तालुक्यातील कान्हुर पठार, शेवगाव तालुक्यातील बोधेगावातील दोन ठिकाणी, नेवासा शहरातील दोन ठिकाणी, तसेच नगर शहरातील भिंगार, कोतवाली व तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या गुटखा, मावा विक्रीकर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईमध्ये मावा तयार करण्यासाठी वापरणार्‍या मशीन, वाहतूकसाठी वापरणारे टेम्पो, आरडीएमडी गुटखा, एम कंपनीची सुगंधी तंबाखू, मिक्स सुपारी, कच्ची सुपारी चुरा, तयार मावा, पिशव्या, चुना, हिरा पान मसाला आदी मुद्देमाल जप्त केला आहे. अशा सहा कारवाईत दहा लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी सर्व जप्त केलेला मुद्देमाल संबंधित पोलीस ठाण्यात आहे. पोलिसांनी छापे टाकूनही केवळ अन्न प्रशासनाचे अधिकारी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आले नाही, म्हणून गुन्हे दाखल झाले नाही. याबाबत अन्न प्रशासन उपायुक्त संजय शिंदे यांना विचारणा करण्यात आली. लॉकडाऊन काळात जिल्ह्यात पोलिसांनी जे छापे टाकले याबाबत आम्हाला माहिती मिळाली.

आम्ही तो सर्व मुद्देमाल पोलीस ठाण्याकडून हस्तांतरित केला आहे. सुगंधी तंबाखू, तयार मावा, वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा, पानमसाला याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. संबंधित अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. परंतु, ‘सार्वमत’ने बातमी छापल्यानंतर दुसर्‍याच दिवशी एक गुन्हा दाखल करण्यात आला. भिंगारमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत टाकलेल्या छाप्याबाबत तोफखाना पोलिसांचे पत्र मिळाले असून उद्या (गुरुवारी) तो गुन्हा दाखल होईल. इतरही गुन्हे दाखल केले जातील, असे अन्न प्रशासनचे उपायुक्त संजय शिंदे यांनी सांगितले.

हा गुन्हा दाखल
अत्यावश्यक सेवेची वाहतूक करण्याच्या परवाना वापरून टेम्पोमधून कांदा गोणीची वाहतूक बरोबर गुटखा व सुगंधी तंबाखूची वाहतूक करणार्‍या दोघांना ताब्यात घेतले होते. 24 एप्रिलला रात्री दीड वाजता नगर-सोलापूर रोडवरील दरेवाडी शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. सलीम युसुफ शेख (वय- 24 रा. वाळुंज ता. गंगापूर जि. औरंगाबाद), संतोष अशोक शिंदे (वय- 34 रा. बिडकीन ता. पैठण जि. औरंगाबाद) असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक टेम्पो, हिरा पानमसाला गुटखा, हिरा मिक्स तंबाखूचे पोते असा एकुण पाच लाख 42 हजार 256 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. यामध्ये दोन लाख 15 हजार रुपयांचा गुटख्याचा समावेश आहे. भिंगार पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 28) अन्न सुरक्षा अधिकारी कालिदास शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सलीम युसुफ शेख व संतोष अशोक शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com