गुटख्याच्या कारवाईतही ‘पंटर’ चा वापर
Featured

गुटख्याच्या कारवाईतही ‘पंटर’ चा वापर

Sarvmat Digital

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर-पढेगाव रस्त्यावर घडला प्रकार

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- दारूच्या कारवाईमध्ये ‘पंटर’ चा वापर ही काही नवीन बाब नाही. परंतु चक्क गुटख्याच्या कारवाईमध्ये ‘पंटर’ चा वापर करून एक प्रकरण मिटविण्यात आले आहे. तालुक्यातील बेलापूर परिसरात हा प्रकार घडला. दि. 4 मे 2020 रोजी तालुक्यातील बेलापूर-पढेगाव रोडवर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून प्रतिबंंधित अन्न पदार्थांचे उत्पादन, वाहतूक व साठ्यावर बंदी असतानाही एका वाहनावर छापा टाकून सुमारे 4 लाख 50 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला होता. वास्तविकपणे हा गुटखा बेलापूर- पढेगाव रस्त्यावरील एका मोठ्या व्यापार्‍याच्या गोडावूनमधून जप्त करण्यात आला होता.

गुरुवारी पहाटे चार वाजेपर्यंत अन्न औषध प्रशासनाचे पथक बेलापुरात होते. मध्यरात्री एक वाजता हा छापा पडला होता. सदर गोडावूनवर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकल्याची माहिती परिसरात वार्‍यासारखी पसरली. तेव्हा ‘त्या’ मोठ्या व्यापार्‍याची बदनामी होऊ नये म्हणून एका स्थानिक मध्यस्थामार्फत सदर व्यापार्‍याकडून मोठी ‘सेटलमेंट’ करून या प्रकरणावर पडदा पाडला.

सदर व्यापार्‍याचे नाव येऊ नये म्हणून गुन्हा दाखल करताना एका ‘पंटर’चा वापर या प्रकरणामध्ये करण्यात आला. बेलापूर-पढेगाव रोडवर एका वाहनामध्ये थोड्याफार प्रमाणात गुटखा ठेवून ‘त्या’ वाहनावर कारवाई झाल्याचे चित्र उभे केले गेले. वास्तविक या गोडावूनमध्ये लाखो रुपयांचा गुटखा होता. परंतु कारवाईत अगदी नगण्य दाखविण्यात आला. त्यामुळे सदर बड्या व्यापार्‍याकडून मोठी सेटलमेंट करून त्याला पडद्याआड करण्यात आले.

याआगोदर तालुक्यात अनेक ठिकाणी प्रशासनाकडून दारुच्या कारवाया करण्यात आल्या. सदर कारवायाही शहरातील बड्या लोकांवर करण्यात आल्या होत्या. परंतु सदर प्रकरण मिटविण्यासाठी एका पंटरला उभे करून त्या प्रकरणावर पडदा पाडला जायचा. पंटरला काही प्रमाणात चेरीमेरी देऊन पुढे केले जायचे. दारुच्या कारवाईमध्ये पंटरचा वापर काही नवीन नव्हता. परंतु आता गुटख्याच्या कारवाईमध्येही पंटरचा वापर केला गेल्याने त्याची बेलापूर परिसरासह तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com