file photo
file photo
Featured

बेलापुरात 4 लाख 50 हजारांचा गुटखा पकडला

Sarvmat Digital

बेलापूर (वार्ताहर)- प्रतिबंंधित अन्न पदार्थाचे उत्पादन, वाहतूक व साठ्यावर बंदी असतानाही तालुक्यातील बेलापूर-पढेगाव रोडवर एका वाहनावर छापा टाकून अन्न व औषध प्रशासनाने सुमारे 4 लाख 50 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे सुरक्षा अधिकारी साहेबराव विष्णू मुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मदन विजय कणगरे (रा. नवीन घरकुल, गोंधवणी रोड) यांच्याविरुध्द अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार फिर्यादी श्री. मुळे हे पंच शकूर जब्बार शेख, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त के.जी. गोरे, सूर्यवंशी, नमुना सहाय्यक प्रसाद कसबेकर आदींसह बेलापूर येथील झेंडा चौकाजवळ बेलापूर-पढेगाव रोडवर दाखल झाले.

त्यावेळी महिंद्रा बोलेरो पिकअप् (एम.एच. 18 ए.ए. 6450) ही आरोपी मदन विजय कणगरे घेऊन जात असताना सदर गाडी अडवून चौकशी केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी गाडीची तपासणी केली असता यामध्ये 3 लाख 60 हजार रुपयांचा हिरा पान मसाला व 90 हजार रुपयांची रॉयल तंबाखू असा एकूण 4 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी मुद्देमालासह वाहन जप्त केले आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पुढील तपास पीएसआय उजे करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com