‘गुरुमाऊली’च्या दोन्ही गटांचे मनोमिलन
Featured

‘गुरुमाऊली’च्या दोन्ही गटांचे मनोमिलन

Sarvmat Digital

शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी दुसुंगे, उपाध्यक्ष बडाख

अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील सहा महिन्यांपूर्वी जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्यावेळी काही कारणांमुळे दुरावलेले तांबे-रोहकले गट पुन्हा या निवडीचे निमित्त साधून आज एकत्र आले आहेत. रविवारी झालेल्या बँकेच्या पदाधिकारी निवडीत अध्यक्षपदी संतोष दुसुंगे (नगर तालुका) यांची, तर उपाध्यक्षपदी नानासाहेब बडाख (श्रीरामपूर) यांची बिनविरोध निवड झाली.

जिल्हा बँकेत गेल्या पंचवार्षिकला झालेल्या निवडणुकीनंतर गुरूमाऊली मंडळाची सत्ता आली होती. मात्र,मागील पाच महिन्यांपूर्वी झालेल्या पदाधिकारी निवडीमध्ये गुरुमाऊली मंडळात दोन गट निर्माण होऊन मंडळाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे यांच्या गटाचे साहेबराव अनाप यांची अध्यक्षपदी तर बाळासाहेब मुखेकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.

यानंतर तांबे गटाकडे चौदा तर विरोधी विरोधी रोहोकले गटाकडे सात संचालक होते. या गटबाजीबद्दल जिल्ह्यातील सामान्य गुरुमाऊली प्रेमींनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली होती. दोन्ही गटांचे मनोमिलन व्हावे यासाठी गुरुमाऊली मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब सरोदे, राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट, संचालक अनिल भवार, साहेबराव अनाप, बँक शताब्दी समितीचे अध्यक्ष सलीमखान पठाण तसेच रोहोकले गटातर्फे प्रवीण ठुबे, राम निकम, अविनाश निंभोरे आदिंनी मंडळा अंतर्गत संवाद साधून एकीकरणाची प्रक्रिया राबविली.

शनिवारी याबाबतचे निर्णय घेण्याचे सर्वाधिकार दोन्ही गटाकडून बापूसाहेब तांबे व प्रवीण ठुबे यांना देण्यात आले. दोघांनी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून एकीकरणाची रणनीती ठरविली. त्यानुसार तांबे गटाला बँकेचे अध्यक्षपद तर रोहोकले गटाला उपाध्यक्षपद देण्याचे निश्चित झाले. पदाधिकारी निवड होईपर्यंत दोन्ही बाजूंनी याबाबत गुप्तता पाळण्यात येऊन या निवडी जाहीर करण्यात आल्या.

त्यानंतर बँकेत झालेल्या सभेमध्ये उपस्थित सर्व नेते व कार्यकर्त्यांनी या करण्याबद्दल समाधान व्यक्त केले यावेळी चेअरमन दुसुंगे यांनी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याबाबत भावना व्यक्त केल्या. तसेच व्हा. चेअरमन बडाख यांनी निवड बिनविरोध केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी काम पाहिले. त्यांना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण देशमुख व दिलीप मुरदारे यांनी सहकार्य केले.

याप्रसंगी, बाळासाहेब मुखेकर, किसनराव खेमनर, विद्युल्लता आढाव, सीमा क्षीरसागर, संतोष अकोलकर, दिलीप औताडे, अविनाश निंभोरे, राजू मुंगसे, शरद सुद्रिक, बाबासाहेब खरात, राजु राहणे, गंगाराम गोडे, अर्जुन शिरसाट,उषा बनकर, मंजुषा नरवडे तसेच आबासाहेब जगताप, विठ्ठल फुंदे, दत्तात्रय कुलट, बाळासाहेब सरोदे, राजकुमार साळवे, मच्छिंद्र लोखंडे, बाळासाहेब तापकीर, बाबाजी डुकरे, संजय शिंदे, राम निकम, विजय ठाणगे, संभाजी आढाव, बाळासाहेब चाबुकस्वार, आर.टी.साबळे, आदी उपस्थित होते.

  • आभार सभेमध्ये प्रवीण ठुबे आणि विकास डावखरे यांच्या मध्ये शाब्दिक वाद झाले. विकास मंडळा बाबत कोणी न बोलल्यामुळे विकास डावखरे यांना राग आला व त्यांनी रावसाहेब रोहोकले गुरुजींचा उल्लेख याठिकाणी करायला पाहिजे होता असे मत व्यक्त केले. परंतु ही बँकेच्या पदाधिकारी निवडीची सभा असून विकास मंडळा बाबत स्वतंत्र बैठक घेतली जाणार असल्याचे प्रवीण तुपे यांनी सांगितले.
  • बँकेच्या चेअरमन पदाच्या निवडी दरम्यान गुरूमाऊली मंडळाचे तिन संचालक काही नेत्यांच्या आमिशाला बळी पडले. या तीन शिक्षक नेत्यांनी गुरूमाऊलीत पुन्हा फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. यामुळेच संचालक किसन खेमनर, बाळासाहेब मुखेकर आणि बाबा खरात यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अर्ज घेतले. मात्र, परिस्थिती पाहताच त्यांचे अवासन गळाले.

विद्यमान परिस्थितीत बँकेचा कारभार माजी अध्यक्ष रावसाहेब अनाप आणि मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे यांनी चांगल्या पध्दतीने चालविल्यामुळे गुरुमाऊली मंडळाच्या सभासदांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच गुरूमाऊली मंडळ फोडणार्‍यांना बाजूला ठेवून मंडळात स्वच्छता मोहीम राबविल्याबद्दल तांबे आणि अनाप यांना धन्यवाद दिले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com