पालकमंत्री पदाच्या घोळाने भंडारदरा, मुळा धरणांच्या आवर्तनांचा निर्णय रखडला

jalgaon-digital
1 Min Read

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली. पण त्यांनी हे पद घेण्यास नकार दिल्याने याबाबतचा घोळ कायम आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील जीवनदायिनी असलेल्या मुळा आणि भंडारदराच्या कालव्यांच्या आवर्तनांचे नियोजन करण्यासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक कुणी घ्यायची याचा पेच उभा राहिला आहे.

कुकडी प्रकल्प आणि गोदावरी कालव्याच्या आवर्तनाचा निर्णय घेण्यात आला आहे. सल्लागार समितीच्या बैठका त्या त्या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आहेत. त्यामुळे या धरणांच्या कालव्यांच्या रब्बी आणि उन्हाळी आवर्तनांचा प्रश्न मार्गी लागला आहे.
मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणांत मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे या धरणांच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना रब्बी आणि उन्हाळी अशी चार आवर्तने मिळू शकतात. पण ना. थोरात यांनी पालकमंत्री पद स्वीकारलेले नाही.

त्यामुळे या पदावर नवीन नियुक्तीही झालेली नाही. त्यामुळे या समितीच्या बैठका कुणी घ्यायच्या हा प्रश्न उपस्थित झाला आहे. पालकमंत्री पदी लवकरात लवकर वर्णी लागावी आणि कालवा सल्लागार समितीची बैठक होऊन आवर्तनाचा प्रश्न मार्गी लागावा अशी मागणी दोन्ही धरणांच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *