पालकमंत्री प्रथमच आज नगरला
Featured

पालकमंत्री प्रथमच आज नगरला

Sarvmat Digital

आवर्तने ठरणार, जिल्हा नियोजनचीही बैठक

अहमदनगर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज सोमवारी प्रथमच नगरमध्ये येत आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली मुळा, भंडारदरा, निळवंडे कालवा सल्लागार समितीची, जिल्हा नियोजन समितीची बैठक नियोजन भवन , जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे या बैठकीत किती आणि केव्हा आवर्तने दिली जातात तसेच नियोजन समितीच्या माध्यमातून ते जिल्ह्याचा विकास कसा साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुबलक पाणीसाठा
नगर जिल्ह्याच्या जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा आणि निळवंडे धरणात कधी नव्हे एवढा मुबलक साठा आहे. 11000 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात 10844 तर 8320 दलघफू क्षमतेच्या निळवंडेत 7982 दलघफू म्हणजे एकूण 19164 दलघफू पाणी उपलब्ध आहे. जुलैपर्यंत शेती आणि पिण्यासाठी 10 ते 12 हजार दलघफू पाणी खर्च झाले तरी पाणी शिल्लक राहते. 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणात 25187 दलघफू पाणी आहे. या धरणांमधून रब्बीसाठी एक आणि उन्हाळी तीन अशी चार आवर्तने दिली तरी या धरणांत पाणी शिल्लक राहणार आहे. पण वेळापत्रक कसे जूळवून आणले जाते यावर तीन की चार आवर्तने याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

झेडपीला झुकते माप मिळणार
बैठकीत भाजपच्या पालकमंत्र्यांच्या कार्यकाळात झालेल्या 15 जून 2019 जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या इतिवृत्तास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना 2019-20 (सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना व अनुसूचित जाती उपयोजना) पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता, जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 (सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना व अनु. जाती उपयोजना) प्रारूप आराखड्यास मान्यता व ऐनवेळी येणार्‍या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. गेली पाच वर्षे जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. तर जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष हे भाजपचे होते. या काळात देखील पालकमंत्री विरोधात जिल्हा परिषद सदस्य असे चित्र होते. आता महाविकास आघाडीची राज्यात आणि जिल्हा परिषदेत सत्ता आहे. यामुळे पालकमंत्री जिल्हा परिषदेला कशा प्रकारे झुकते माप देणार याकडे सदस्यांचे लक्ष राहणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com