गंभीर परिस्थिती राज्य सरकार खंबीर

गंभीर परिस्थिती राज्य सरकार खंबीर

पालकमंत्री मुश्रीफ : नागरिकांनी स्वत:च्या आरोग्यासाठी कायद्याचे पालन करावे

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना नागरिकांनी साथ दिली पाहिजे. ज्या उपाययोजना केल्या जात आहेत, त्या नागरिकांच्या आरोग्यासाठीच आहेत. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन करू नये आणि विनाकारण घराबाहेर पडू नका, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या गंभीर संकटाचा सामना करण्यासाठी राज्य शासन खंबीर असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, महानगरपालिका आयुक्त एस. एन. म्याकलवार, जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, सध्या कोरोना विषाणू संसर्गाचे संकट आपल्यासमोर आहे. ते रोखण्यासाठी राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने ज्या ज्या उपाययोजना करणे गरजेचे आहे, ते करीत आहेत. मात्र, नागरिकांनी त्याला प्रतिसाद देणे आवश्यक आहे. येथील नागरिकांच्या आरोग्यासाठी हे प्रतिबंधात्मक आदेश आहेत, याची जाणीव नागरिकांनी ठेवली पाहिजे. विनाकारण आणि अनावश्यकरित्या घराबाहेर पडू नका, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच आरोग्य सुविधांसंदर्भात त्यांनी माहिती घेतली.

जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि पोलीस प्रशासन अशा आपत्तीच्या वेळी चांगले काम करीत आहे. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून आणि घराबाहेर न पडता त्यांना सहकार्य करावे. अधिक गंभीर परिस्थिती उद्भवू नये, यासाठी सर्वांनीच काळजी घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडून सद्यस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यात आतापर्यंत 261 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 256 व्यक्तींना त्यांच्या घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. दरम्यान, यापैकी 200 व्यक्तींचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आले होते. त्यातील 196 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. सध्या 2 जणांचे अहवाल येणे बाकी आहे. तर 2 जण यापूर्वीच कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याची माहिती द्विवेदी यांनी दिली.

जिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक असणार्‍या व्हेंटिलेटर खरेदीसाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून सात व्हेंटिलेटर घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी पालकमंत्री मुश्रीफ यांना देण्यात आली. याशिवाय, कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव वाढला तर रुग्णांना ठेवण्यासाठी जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालये, काही ठिकाणची वसतिगृहे, तसेच काही इमारती यांची पाहणी करून तशी तयारी ठेवण्यात आली आहे. मात्र, नागरिकांनी अधिक काळजी घेतली तर ही वेळ येणार नाही, असे पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले.

मुश्रीफ म्हणाले, पुढील दोन आठवडे अतिशय महत्त्वाचे आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ज्या उपाययोजना केल्या आहेत, नागरिकांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे, कारण ही सर्वांच्या आरोग्याच्यादृष्टीने महत्त्वाची बाब आहे. संसर्ग होऊ नये, तो वाढू नये, यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे घराबाहेर पडू नका. संपर्क टाळा. कोरोना विषाणूचं संकट पुढच्या टप्प्यात जाणार नाही, यासाठीची आवश्यक ती सर्व दक्षता आपल्याला घ्यावी लागणार आहे. असे ते म्हणाले. जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात मागेपुढे पाहू नये. विषाणूचा प्रादुर्भाव पाहता याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे ते म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com