मुश्रीफ नगर, थोरात कोल्हापूर, गडाख उस्मानाबादचे पालकमंत्री

मुश्रीफ नगर, थोरात कोल्हापूर, गडाख उस्मानाबादचे पालकमंत्री

अजित पवारांकडे पुणे, नाशिकचा भुजबळ, बीड धनजंय मुंडे तर सोलापूरचा वळसे पाटलांकडे कारभार

मुंबई-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या पालकमंत्री म्हणून नियुक्त्या केल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अपेक्षेनुसार पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर आदित्य ठाकरे यांना मुंबई उपनगर जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे.

नगर जिल्ह्याचा कारभार राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यातील दिग्गज नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे खंदे समर्थक आहेत. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे कोल्हापूरची जबाबदारी देण्यात आली आहे. नेवाशाचे क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष तथा मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे उस्मानाबादचा कारभार देण्यात आलेला आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सांगली, एकनाथ शिंदे यांची ठाणे आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती केली आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोलापूरचा कारभार सोपविण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांच्याकडे पुन्हा एकदा नाशिकचे पालकत्व आले आहे. औरंगाबादचे शिवसेना नेते सुभाष देसाई पालकमंत्री असतील.

कोण आहेत हसन मुश्रीफ

हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातील बडं प्रस्थ. सध्या ठाकरे सरकारमध्ये ते ग्रामविकास विभागाचे कॅबिनेट मंत्री आहेत. मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे आणि विश्वासू नेते मानले जातात. कागल विधानसभा निवडणुकीत त्यांनी पाचव्यांदा बाजी मारत आपण जनतेच्या मनातील ‘हिंदकेसरी’ असल्याचे दाखवून दिलेले आहे. राष्ट्रवादीचा बडा मुस्लिम चेहरा म्हणून मुश्रीफ यांची पश्चिम महाराष्ट्रात ओळख आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात मुश्रीफ यांचा दबदबा आहे.आघाडी सरकारच्या काळात हसन मुश्रीफ यांची मंत्रिपदी वर्णी लागली होती. त्यांनी कामगार मंत्रिपद सांभाळलं.2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही त्यांनी विजय मिळवला. कोल्हापूर जिल्हा बँक, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, गडहिंग्लज कारखान्यावर त्यांचे वर्चस्व राहिलेले आहे.

पालकमंत्र्यांची यादी
मुंबई शहर : अस्लम शेख, मुंबई उपनगर : आदित्य ठाकरे, ठाणे: एकनाथ शिंदे,
रायगड : आदिती तटकरे
रत्नागिरी : अनिल परब
सिंधुदुर्ग : उदय सामंत
पालघर : दादाजी भुसे
नाशिक : छगन भुजबळ
धुळे : अब्दुल सत्तार
नंदुरबार : के. सी. पाडवी
जळगाव : गुलाबराव पाटील,
अहमदनगर : हसन मुश्रीफ
उस्मानाबाद : शंकरराव गडाख
सातारा : शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील
सांगली : जयंत पाटील
सोलापूर : दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर : बाळासाहेब थोरात
औरंगाबाद : सुभाष देसाई
पुणे : अजित पवार 

जालना : राजेश टोपे
परभणी : नवाब मलिक
हिंगोली : वर्षा गायकवाड
बीड : धनंजय मुंडे
नांदेड : अशोक चव्हाण
लातूर : अमित देशमुख
अमरावती : यशोमती ठाकूर
अकोला : बच्चू कडू
वाशिम : शंभुराज देसाई
बुलढाणा : राजेंद्र शिंगणे
यवतमाळ : संजय राठोड
नागपूर : नितीन राऊत
वर्धा : सुनिल केदार
भंडारा : सतेज पाटील
गोंदिया : अनिल देशमुख
चंद्रपूर : विजय वडेट्टीवार
गडचिरोली : एकनाथ शिंदे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com