विशेष साहाय्य योजनेतील दीड लाख लाभार्थ्यांना अनुदान वाटप – पालकमंत्री हसन मुश्रीफ
Featured

विशेष साहाय्य योजनेतील दीड लाख लाभार्थ्यांना अनुदान वाटप – पालकमंत्री हसन मुश्रीफ

Sarvmat Digital

अहमदनगर – राज्य शासनाच्या विविध सामाजिक योजनांच्या जिल्ह्यातील अंमलबजावणीचा आढावा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला. विशेष साहाय्य योजनेतील १ लाख ६२ हजार १४८ लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

संजय गांधी निराधार अनुदान, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन अशा विशेष साहाय्य योजनेतील १ लाख ६२ हजार १४८ लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील मोठ्या धरणांत सध्या ३६ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा असून मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा२४ टक्के असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्हयात सध्या २१ शासकीय आणि ६१ खाजगी टॅंकरद्वारे ७२ गावे आणि २९१ वाड्यांना पाणीपुरवठा होत असून टॅंकर मंजुरीचे अधिकार उपविभागीय अधिकार्‍यांना दिल्याची माहितीही त्यांनी दिली. रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात सध्या २०६९ कामे सुरु असून त्यावर १० हजार ३१० मजूर कामांवर असल्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी तसेच केशरी कार्डधारकांना राज्य शासनाने ठरवून दिलेल्या नियतनाप्रमाणे धान्य वाटप करण्यात आले आहे. मे महिन्यातील ८३ टक्के धान्याचे वाटप पूर्ण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत प्रतिमाह अर्धा किलो चणाडाळ आणि अर्धा किलो तूरडाळ वाटप करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

Deshdoot
www.deshdoot.com