Friday, April 26, 2024
Homeनगरआगामी पाच वर्षांत 661 ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांच्या हाती !

आगामी पाच वर्षांत 661 ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांच्या हाती !

सरकारने जाहीर केली सरपंचपदासाठीची आरक्षण सोडत

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात 2020 ते 2025 या पाच वर्षांत 1 हजार 218 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण लवकरच जाहीर होणार आहे. त्यासाठी ग्रामविकास विभागाने जिल्हानिहाय आरक्षण निश्चित केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 611 ग्रामपंचायतींचे सरपंचपद हे महिला प्रवर्गासाठी राखीव असणार आहेत.

- Advertisement -

ग्रामविकास विभागाने 5 मार्च 2020 रोजी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसुचनेनुसार आगामी पाच वर्षांत होणार्‍या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण निश्चित केले आहे. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग याबरोबरच महिलांचे आरक्षण किती राहील याची माहिती शासनाने दिली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाला ग्रामपंचायतनिहाय सरपंचपदासाठी आरक्षण सोडत काढावी लागणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांसाठी 50 टक्के आरक्षण निश्चित केले आहे. त्यानुसार अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 151 गावांतील सरपंचपद आरक्षित असणार आहे. यापैकी 76 ठिकाणी महिला सरपंचपदी बसणार आहेत. अनुसूचित जमातीसाठी एकूण 83 जागा असणार असून, महिलांसाठी 42 जागा असणार आहेत.

नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण 329 जागा असून, यामध्ये 165 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. खुुल्या प्रवर्गासाठी 655 जागा निश्चित केल्या असून, यामध्ये 328 जागा या महिला प्रवर्गासाठी राखीव असणार आहेत. शासनाच्या आदेशानुसार 1 हजार 218 ग्रामपंचायतींपैकी 611 ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिला प्रवर्गासाठी राखीव असणार आहे.

त्यामुळे आगामी पाच वर्षात 611 ग्रामपंचायतींवर महिलाराज अवतरणार आहे. कोणत्या गावांसाठी सरपंचपद खुले असणार याची मात्र जिल्ह्यातील ग्रामस्थांना उत्सुकता लागली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या