Suspended grunge rubber stamp on white, vector illustration
Suspended grunge rubber stamp on white, vector illustration
Featured

ग्रामपंचायतमध्ये गैरव्यवहार तीन ग्रामसेवक निलंबित

Sarvmat Digital

झेडपी मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांची कारवाई

अहमदनगर (प्रतिनिधी)- अकोले तालुक्यातील शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या सुषमाताई दराडे यांनी तालुक्यातील राजुर, केळी, रुम्हणवाडी, शेणीत, तिरडे, आंबेवंगण या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी गटविकास अधिकारी संबंधीत ग्रामसेवकांना पाठीशी घालत असल्याचे दराडे यांचे म्हणणे होते. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या पथकाने केलेल्या तपासणी शेणीत, तिरडे, आंबेवंगण ग्रामपंचायतीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे सिध्द झाल्याने तेथील ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले आहे.

मागील महिन्यांत अकोले पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्या कार्यपध्दतीसोबत तालुक्यातील राजुर, केळी, रुम्हणवाडी, शेणीत, तिरडे, आंबेवंगण या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप सदस्या दराडे यांनी केला होता. या सर्वांच्या चौकशीसाठी दराडे यांनी जिल्हा परिषदेत एक दिवसाचे पोषण केले होते. त्यावर तत्कालीन उपाध्यक्षा राजश्रीताई घुले यांनी दराडे यांच्या आरोपांची चौकशी करून दोषीवर कारवाईचे आश्वासन देत उपोषण सोडविले होते.

दरम्यान, मुख्य कार्यकारीर अधिकारी शिवराज पाटील यांनी या ग्रामपंचायतींसह अकोल्याचे गटविकास अधिकारी यांच्या दप्तर तपासणीसाठी तीन पथकांची नियुक्त केली होती. यातील एका पथकाची तपासणी पूर्ण झाली असून त्यांनी आपला अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केला आहे. यात तिरडे, आंबेवंगण, शेणीत या तीन ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रथमदर्शनी दोषी आढळले आहेत. यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित पथकांचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई करण्या येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

27 तारखेची सभा गाजणार
अकोले येथील ग्रामपंचायत आणि गट विकास अधिकारी यांच्यावरील आरोप प्रकरणात सदस्य दरोडे यांनी तत्कालीन अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील यांच्यावर आरोप केले होते. या आरोपांची तपासणी करून आता अध्यक्षा राजश्रीताई घुले यांनी उत्तरे द्यावीत, अशी मागणी माजी अध्यक्षा विखे यांनी केली आहे. येत्या 27 तारखेला होणार्‍या विशेष सभेत या विषयावरून घमासान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com