सरकारने आदेश दिल्यास 2741 शाळा भरू शकतात !

सरकारने आदेश दिल्यास 2741 शाळा भरू शकतात !

शाळा व्यवस्थापन समितीकडून आलेली माहिती शालेय शिक्षण विभागाला सादर

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात असलेल्या सर्व व्यवस्थपानाच्या पहिली ते बारावीपर्यंतच्या 5 हजार 371 शाळांपैकी सुमारे निम्म्या म्हणजे 2 हजार 741 शाळा राज्य सरकारने आदेश दिल्यास करोनाच्या परिस्थितीतही भरू शकतात. या त काही शाळा नियमित, काही अर्धवेळ तर काही शाळा दिवसाआड सुरू होऊ शकतात. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थापन समितीकडून मागविलेल्या माहितीनुसार ही आकडेवारी समोर आली आहे.

शाळा पातळीवरून आलेली ही माहिती जि.प. शिक्षण विभागाने राज्य सरकारला सादर आहे. दरम्यान, 1 हजार 625 शाळा या सध्या क्वारंटाईनसाठी वापरात आहेत, तर 290 शाळा असलेल्या गावात करोनाचे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे अशा 1 हजार 915 शाळा सध्या सुरू करणे शक्य नाही. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ही माहिती शालेय शिक्षण विभागाला सादर केली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर अडीच महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये शालेय शिक्षण विभागाने 15 जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र, त्याला पालकांसह सर्वच थरांतून विरोध झाल्याने शिक्षण विभागाने राज्यातील जिल्ह्यातून शाळा व्यवस्थापन समितीकडून सविस्तर माहिती मागवली होती.

यात जिल्ह्यात करोनाची स्थिती कशी आहे, कोणत्या शाळा नियमित सुरू होऊ शकतात, कोणत्या शाळा अर्धवेळ सुरू करता येतील, कोणत्या शाळा दिवसाआड सुरू करणे शक्य आहे, कोणत्या शाळा ऑनलाईन भरवता येतील, एकूण शिक्षक किती, त्यातील करोनासाठी किती शिक्षक नियुक्त आहेत, संबंधीत गावात बीएड-डिएड स्वयंसेवी शिक्षक उपलब्ध होवू शकतात. क्वारंटाईनसाठी किती शाळांचा वापर करण्यात आला आहेत. मुख्यालयात राहणार्‍या शिक्षकांची संख्या या माहितीचा यात समावेश होता.

त्यानूसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थापन समितीकडून सविस्तर माहिती घेऊन अहवाल तयार केला व तो दोन दिवसांपूर्वी शालेय शिक्षण विभागाला पाठवला आहे. जिल्ह्यात पहिली ते बारावीच्या एकूण 5 हजार 372 शाळा आहेत. त्यातील 2 हजार 446 शाळा नियमित पूर्ण वेळ सुरू होऊ शकतात, असे अहवाल स्पष्ट म्हटले आहे. याशिवाय 669 शाळा जिथे पटसंख्या जास्त आहे, त्या नियमित मात्र अर्धवेळ सुरू करता येतील, तर 1 हजार 541 शाळा दिवसाआड सुरू होऊ शकतात, असे अहवाल कळवले आहे.

सुरू होऊ शकणार्‍या शाळा कंसात एकूण शाळा
अकाले 445 (518), जामखेड 209 (245), कोपरगाव 183 (277), कर्जत 340 (359), नगर 322 (368), नेवासा 339 (360), पारनेर 446 (453), पाथर्डी 341 (406), राहुरी 294 (360), राहाता 206 (274), शेवगाव 246 (324), संगमनेर 485 (510), श्रीगोंदा 455 (478), श्रीरामपूर 234 (242), महापालिका 111 (198) एकूण 2 हजार 741 (5 हजार 372).

24 हजार शिक्षक राहतात मुख्यालयी
जिल्ह्यात कार्यरत 31 हजार 451 शिक्षकांपैकी 24 हजार 11 शिक्षक मुख्यालयी राहत असल्याची माहिती शाळा व्यवस्थापन समितीने सादर केलेल्या आकडेवारीत समोर आली आहे. यासह 7 हजार 811 शिक्षकांची करोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजना राबविण्यासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

लाखभर विद्यार्थ्यांकडे सुविधांचा वणवा
जिल्ह्यात एकूण असणार्‍या 9 लाख 11 हजार 752 विद्यार्थ्यांपैकी 5 लाख 36 हजार 568 विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी टीव्हीची सुविधा आहे. तर 3 लाख 5 हजार 149 विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोनची सुविधा असून 78 हजार 897 विद्यार्थ्यांकडे किमान रेडीओची सुविधा आहे. उर्वरित 1 लाख 5 हजार 717 विद्यार्थ्यांकडे कोणतीच सुविधा नसल्याची माहिती करोना संसर्गात ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी संकलित केलेल्या माहितीत समोर आली आहे.

ऑनलाईन शाळेसाठी कोपरगाव आग्रही
जिल्ह्यात करोना संसर्गात ऑनलाईन शिक्षण हवे, अशी सर्वाधिक मागणी कोपरगाव तालुक्यातील शाळांकडून झाली आहे. तालुक्यातील 94 शाळांनी तशी मागणी नोंदवली आहे. तर पारनेर तालुक्यातील अवघ्या 7 आणि श्रीरामपूर तालुक्यातील 8 शाळांनी या बाबत मागणी केली आहे. उर्वरितमध्ये नगर शहर 87, अकोले 73, जामखेड 33, कर्जत 19, नगर 46, नेवासा 21, पाथर्डी 65, राहुरी 66, राहाता 68, शेवगाव 78, संगमनेर 25, श्रीगोंदा 23 यांचा समावेश आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com