देशमुख यांच्याकडे गृह, थोरात महसूल, पाटलांकडे सहकार गडाख जलसंधारण आणि तनपुरेंकडे उर्जा खात्याचा पदभार
Featured

देशमुख यांच्याकडे गृह, थोरात महसूल, पाटलांकडे सहकार गडाख जलसंधारण आणि तनपुरेंकडे उर्जा खात्याचा पदभार

Sarvmat Digital

अजित पवारांकडे अर्थ भुसे कृषी, माजी सैनिक कल्याण वळसे पाटलांकडे कामगार, राज्य उत्पादन शुल्क

मुंबई – ठाकरे मंत्रिमंडळाचं बहुप्रतीक्षित खातेवाटप अखेर जाहीर झालं आहे. त्यामुळे अखेर कोणत्या मंत्र्याकडे कोणत्या खात्याची जबाबदारी असणार, हे आता स्पष्ट झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्रिपदाची धुरा देण्यात आली आहे. महसूलमंत्रीपद काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडेच कायम ठेवण्यात आले आहे.

या खातेवाटपामध्ये राष्ट्रवादीने गृह खाते हे अनिल देशमुखांकडे देत सगळ्यांनाच धक्का दिला आहे. शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी असलेले अनिल देशमुख हे उच्चशिक्षित, स्वच्छ प्रतिमेचे, शेतकरी, बहुजन, सर्वसामान्यांसाठी लढणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे गृह खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कृषी खाते दादाजी भुसे यांच्याकडे आले आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा हे खाते सोपवण्यात आले आहे.

पर्यावरण खाते हे आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा खातं देण्यात आलं आहे. नेवाशाचे कॅबिनेटमंत्री शंकरराव गडाखांकडे मृद व जलसंधारणाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर राहुरीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन खाते देण्यात आले आहे.

राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेलं गृहमंत्रिपद नक्की कुणाकडे दिलं जाणार, याबाबत मोठी उत्सुकता होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धक्कातंत्राचा अवलंब करत काटोल मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांच्याकडे गृहखात्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे जयंत पाटील, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील हे दिग्गज स्पर्धेत असताना गृहमंत्रिपदी बाजी मारणारे अनिल देशमुख नेमके कोण आहेत, याबाबत आता राज्यभर चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या कामाचे मूल्यमापन होणार – जयंत पाटील

काळ वेगाने पुढे चालला आहे. त्यामुळे सर्व मंत्र्यांच्या कामांचं मूल्यमापन ठराविक काळाने व्हायलाच हवं. एखाद्या मंत्र्याला जे खातं (मंत्रिपद) सोपवलं आहे, त्याने ती जबाबदारी नीट पार पाडली आहे का? त्याने किती कामं केली आहेत? त्याने मंत्रिपद सांभाळत पक्षामध्ये किती काम केलं? या सर्व गोष्टींचं मूल्यमापन केलं जाईल असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांच्या कामांचे मूल्यमापन करेन. त्यानुसारच नेत्यांबाबतचे पुढील निर्णय घेतले जातील. आमच्याकडचा कोणताही मंत्री नाराज नाही. सर्वांंना कामाची संधी मिळाली आहे. आम्ही राज्याच्या अपेक्षा पूर्ण करू.

मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचेच वर्चस्व
राज्यातील महाविकास आघाडीचे खातेवाटप अखेर सहा दिवसांनी म्हणजे रविवारी झाले. महत्त्वाच्या खात्यांसाठी सुरू असलेली रस्सीखेच संपुष्टात आली. आता सोमवारी संबंधित खात्यांचे मंत्री आपला पदभार स्वीकारतील. परंतु, संपूर्ण मंत्रिमंडळावर नजर टाकल्यास यावर राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व राहिल्याचे दिसून येते. कारण बहुतांश महत्त्वाची खाती ही राष्ट्रवादीच्या पारड्यात पडली आहेत. अर्थ, गृह, राज्य उत्पादन शुल्क, अन्न व नागरी पुरवठा, सहकार व पणन, आरोग्य, ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक, अन्न व औषध प्रशासन, गृहनिर्माण यासारखी महत्त्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःकडे ठेवली आहेत. यावरुन शरद पवार यांनी सत्तेची सूत्रे आपल्याकडेच ठेवल्याचे दिसून येते. सुरुवातीला मंत्रिमंडळ विस्ताराला सुमारे एक महिन्याचा कालावधी लागला होता. यावरुन महाविकास आघाडीवर मोठ्याप्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यानंतर गत सोमवारी मंत्रिमंडळ विस्तार झाला. पण खातेवाटप होऊ शकले नव्हते. कारण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना महत्त्वाची खाती आपल्याकडे हवी होती. त्यामुळे परस्परातील मतभेदही समोर आले होते.

राज्यात काँग्रेसचं सत्ताकेंद्र बाळासाहेब थोरातच
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हेच राज्यातील प्रमुख नेतृत्व असतील हे काँग्रेस दिल्ली हाय कमांडने खातेवाटपावरून जवळपास स्पष्ट केलं आहे. महाविकास आघाडीच्या शिवाजी पार्क येथील शपथविधीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष थोरात पहिल्या लिस्टमध्ये होते. थोरात हे दिल्ली हाय कमांडच्या गेल्या काही काळात अत्यंत विश्वासू म्हणून जवळ गेले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला तयार होण्यात दिल्ली हायकमांड राज्यातली काँग्रेस नेत्यांचा यात समन्वय करण्याचं काम थोरात यांनी केलं.

Deshdoot
www.deshdoot.com