Friday, April 26, 2024
Homeनगरगोदावरीच्या कालव्यांना 15 एप्रिलला पाणी सुटणार !

गोदावरीच्या कालव्यांना 15 एप्रिलला पाणी सुटणार !

अस्तगाव (वार्ताहर)- गोदावरीच्या कालव्यातून सोडले जाणारे सिंचन तसेच बिगरसिंचनाचे आवर्तन येत्या 13 ला धरणातून तर 15 एप्रिलला नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून प्रत्यक्ष दोन्ही कालव्यातून सुटू शकेल. मात्र हे आवर्तन येत्या दोन दिवसात सोडावे, अशी मागणी प्रगतशील शेतकरी केशवराव बाजीराव चोळके यांनी केली आहे.

गोदावरी कालव्याचे मागील आवर्तन 13 मार्चला प्रत्यक्षात कालव्यांच्या मुखाशी बंद करण्यात आले होते. आता एक महिन्यांनी ते 13 एप्रिलला धरणांमधून सोडण्याची जलसंपदा विभागाची तयारी आहे. हे पाणी खाली नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात येवून तेथून ते 15 एप्रिलला गोदावरीच्या दोन्ही कालव्यांना सुटणार आहे. खाली लाभक्षेत्रात ते 17 एप्रिलपर्यंत पोहचेल असा अंदाज आहे.

- Advertisement -

पहिल्यांदा पिण्यासाठी नंतर सिंचनासाठी पाणी देण्यात येणार आहे. हे आवर्तन 30 दिवस चालेल 15 मेच्या आसपास ते बंद होईल. त्यानंतर एक महिन्याच्या अंतराने पुन्हा 15 जूनला पुढील आवर्तन सोडले जाणार आहे. असे जलसंपदा विभागाचे पाणी सोडण्याचे नियोजन आहे. यास जलसंपदाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी दुजोरा दिला आहे.

लाभक्षेत्रातील पिकांची अवस्था वाईट झाली आहे. धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने वस्तुस्थिती समजावून घेवून दोन दिवसात कालव्यांना पाणी सोडावे, अशी मागणी श्री. चोळके यांनी केली आहे. थोडेफार ऊस आहेत, बागा आहेत, त्या पाण्याअभावी सुकून चालल्या आहेत. शेतकरी कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊन मुळे मेटाकुटीस आला आहे. शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांना आठ दिवसात पाणी न मिळाल्यास त्यांची अवस्था दयनिय बनेल, असेही चोळके यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या