Friday, April 26, 2024
Homeनगरगोदावरीचे उन्हाळी आवर्तन 15 एप्रिलला सुटणार

गोदावरीचे उन्हाळी आवर्तन 15 एप्रिलला सुटणार

12 एप्रिलला सोडणार दारणा समुहातील धरणांमधून पाणी; फळबागांसह हंगामी पिकांना मिंळणार पाणी

अस्तगाव (वार्ताहर)- गोदावरीच्या उन्हाळी आवर्तनासाठी उद्या रविवार दि. 12 एप्रिल रोजी दारणा समुहातील धरणांमधून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर बुधवार दि. 15 एप्रिल रोजी नांदूर मधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीच्या दोन्ही कालव्यांसह वैजापूरच्या दिशेने वाहणार्‍या जलद कालव्यालाही पाणी सोडले जाणार आहे. जलसंपदाच्या नाशिक विभागाने तसे परिपत्रक काढले आहे.

- Advertisement -

सोडण्यात येणारे आवर्तन 22 ते 23 दिवस चालणार आहे. धरणातून दि. 12 रोजी पाणी सोडण्यात आल्यानंतर खाली नांदूरमधमेश्वर बंधार्‍याची लेव्हल आल्यानंतर दि. 15 एप्रिलला गोदावरीचे दोन्हीही कालवे सोडण्यात येणार आहे. उजव्या कालव्याला सोडलेले पाणी साधरणत: 17 एप्रिलला उशिरा अथवा 18 ला सकाळी राहाता अस्तगाव परिसर सोडून पुणतांब्याच्या दिशेने वाहणार आहे.

काटकसरीने होणार्‍या या आवर्तनात टेल टू हेड असे पाणी देण्यात येणार आहे. मागील आवर्तन 14 मार्च रोजी बंद करण्यात आले होते. महिनाभराच्या अंतराने हे उन्हाळी आवर्तन सोडण्यात येत आहे. गोदावरीच्या उजव्या कालव्यावर अडीच हजार हेक्टरला पाण्याची मागणी आहे. तर डाव्या कालव्यावर 2 हजार हेक्टरची मागणी आहे. अशी एकूण साडेचार हेक्टरला दोन्ही कालव्यांमिळून मागणी आहे.

गोदावरी कालव्यांसाठी दारणा तसेच गंगापूर समुहातून पाणी काढण्यात येणार आहे. दारणा, मुकणे, वालदेवी या धरणांमधून पिण्याच्या पाण्यासाठी तसेच सिंचनासाठी पाणी काढण्यात येणार आहे. तर जलद कालव्यासाठी मुकणे, भावली, वाकी, भाममधून पाणी काढले जाणार आहे. सिंचनासाठी हे पाणी अधिकृत फळबागा, बारमाही पिके, हंगामी उभी पिके यांना पुरविण्यात येणार आहे.

लाभक्षेत्रातील ग्रामपंचायत, नगरपालिकांच्या पिण्याच्या पाण्याचे साठे कमी होत चालले आहेत. या शिवाय सिंचनासाठी शेतकरी या आवर्तनाची गेल्या आठवडाभरापासून चातकासारखी वाट पाहात आहेत. तीव्र उन्हामुळे पिके धोक्यात आली आहेत. एकीकडे कोरोनाने थैमान घातलेले असताना भाजीपाला, फळबागा, अडचणीत सापडल्या आहेत. मात्र पुढे सुरळीत होईल या आशेने शेतकरी या आवर्तनाची वाट पाहत आहेत.

राज्यात सध्या कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रसार वेगाने सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात संपूर्ण जिल्ह्यात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन 1973 कलम 144 (1) (3) प्रमाणे जमावबंदी आदेश अंमलात आहे. परस्पर संपर्कामुळे या विषाणुचा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेता हे आवर्तन सुरु असताना जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करु नये, जमावबंदी आदेशाचे पालन करावे, असे आवाहन जलसंपदा विभागातर्फे करण्यात आले आहे.

भरारी पथकांची नियुक्ती
या आवर्तनाच्या पाण्याचा दुरुपयोग होऊ नये, अनधिकृतपणे कुणी पाणी उचलू नये, यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. बेकायदा पाणी उपसा करीत असेल अशांवर कडक पोलीस कारवाई करण्यात येणार आहे. लाभधारक शेतकर्‍यांनी या आवर्तनासाठी सहकार्य करावे व आवर्तन कसे सुरळीत पार पडेल, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जलसंपदाचे नाशिक विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या