शिवसेना पदाधिकार्‍याचे मारेकरी जेरबंद

शिवसेना पदाधिकार्‍याचे मारेकरी जेरबंद

तिघे पुण्याचे सराईत गुन्हेगार, एक दहिगाव बोलकाचा

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)- कोपरगाव शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुरेश (उर्फ भावड्या) शामराव गिर्‍हे(40 वर्ष)यांची राहत्या घरात घुसून सहा हल्लेखोरांनी गोळ्या झाडून तसेच कत्ती, चॉपरच्या सहाय्याने पूर्ववैमनस्यातून खून केल्याची घटना भोजडे येथे रविवार दि.15 मार्च रोजी रात्री 7 ते 8 वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेतील फरार चार आरोपींना पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली.

भोजडे येथील सुरेश शामराव गिर्‍हे व रवी आप्पासाहेब शेटे व त्यांच्या टोळीतील साथीदारांचे पूर्ववैमनस्य होते. सदर वैमनस्यातूनच वारंवार भांडणे होऊन त्यांचे एकमेकांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत. त्यातूनच 2012 मध्ये रवी शेटे व त्याच्या साथीदारांनी सुरेश गिर्‍हे यांचा मित्र बंटी उर्फ विरेश पुंजाहरी शिनगर यांचा खून केला होता. या गुन्ह्यामध्ये रवी शेटे व त्याच्या इतर साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे.

15 मार्च 2020 रोजी सायंकाळी 6 : 45 वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथे सुरेश शामराव गिरे हे त्यांच्या राहात्या घरी भोजडे शिवारातील त्यांच्या कुटुंबासह बसलेले असताना एक पांढर्‍या रंगाची स्विफ्ट कार व एक काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल अशा गाड्या त्यांच्या घरासमोर येऊन थांबल्या. स्विफ्ट कारमधून 4 लोक व पल्सर मोटारसायकलवर रवी आप्पासाहेब शेटे, विजू खर्डे व अनोळखी इसमांनी येत सुरेश गिर्‍हे यांच्या दिशेने पिस्तुलमधून अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केल्याने सुरेश गिर्‍हे हे जीव वाचविण्यासाठी घराच्या पाठीमागे पळू लागल्याने रवी शेटे, विजू खर्डे व त्यांच्या सोबतचे अनोळखी साथीदार मारेकर्‍यांनी सुरेश गिर्‍हे यांचा पाठलाग करून त्यांच्यावर गावठी कट्ट्याने गोळीबार करून, हातातील कोयत्याने तोंडावर व शरिरावर इतर ठिकाणी गंभीर वार करून सुरेश गिर्‍हे यांची हत्या करून मारेकर्‍यांनी आणलेल्या वाहनांवर निघून गेले.

याबाबतची फिर्याद फिर्यादी शामराव भिमराव गिर्‍हे यांनी दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्याकडे वर्ग करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी रवी आप्पासाहेब शेटे याने सुमारे 15 दिवसांपासून गुन्ह्याचा नियोजनबद्ध कट करुन तळेगाव जि. पुणे येथुन भाडोत्री मारेकरी आणून गुन्हा केलेला आहे.

त्याअनुशंगाने गुन्ह्याचा सखोल व बारकाईने तपास करत असताना रवी शेटे व विजु खर्डे याचे सोबत असलेले अनोळखी मारेकरी व इतर आरोपी 1 ) नितीन सुधाकर अवचिते (राहणार – तळेगाव स्टेशन , वाघेला पार्क , ता – मावळ , जि – पुणे 2 ) शरद मुरलीधर साळवे (रा . काळेवाडी फाटा , पिंप्री चिंचवड ता . हवेली जि . पुणे मुळ रा . घर . नं 345 , गारखेडा परिसर , इंदीरानगर , ता . जि . औरंगाबाद,) 3 ) रामदास माधव वलटे (रा . लौकी, पोस्ट दहेगाव बोलका ता . कोपरगाव), 4 ) आकाश मोहन गिरी रा . खराबवाडी , संजिवनी हॉस्पिटल समोर , चाकण ता . खेड जि . पुणे यांना सदर गुन्ह्यात विविध ठिकाणी सापळा लावून शिताफीने गुन्ह्यातील आरोपीना अटक करण्यात आली असून आरोपींने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आरोपी नितीन सुधाकर अवचिते हा सहाईत गन्हेगार असुन त्याच्यावर पुणे जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल ओहत. शरद मुरलीधर साळवे याच्यावरही अनेक गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई ही प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील, अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी सोमनाथ वाकचौरे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.दिलीप पवार पोलीस निरीक्षक अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि संदीप पाटील, सपोनि शिशीरकुमार देशमुख, पो. उपनिरीक्षक गणेश इंगळे,कर्मचारी सफौ नानेकर गाजरे, पोहेकॉ मुळीक, गोसावी, वेठेकर, गव्हाणे , पोना कर्डिले, सोनटक्के, शिंदे, चौधरी, लोढे, दळवी, पोकॉ सातपुते, वाघ, ढाकणे, धनेधर, मासाळकर, बर्डे, मिसाळ, सोळंके, ससाणे, घोडके, माळी, जाधव, पवार, वाबळे, कोल्हे, गायकवाड, चालक भोपळे, बेरड, कोतकर, बुधवंत, कोळेकर, काळे यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com