घोडेगाव कांदा मार्केट शनिवारपासून होणार सुरू

घोडेगाव कांदा मार्केट शनिवारपासून होणार सुरू

शेतकर्‍यांची आगाऊ नोंदणी उद्यापासून; केवळ 25 गोण्यांची मर्यादा

बुधवार व शनिवार दोनच दिवस लिलाव; व्यापारी खरेदी करू शकणार केवळ 200 गोणी कांदा

नेवासा (का. प्रतिनिधी)- जवळपास अडीच महिन्यांच्या खंडानंतर नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे तालुक्यातील घोडेगाव येथील कांदा मार्केट येत्या शनिवारपासून विविध अटी व मर्यादांमध्ये सुरू होणार असून कांदा विक्रीला आणण्याआधी शेतकर्‍यांना मार्केटमध्ये नोंदणी करावी लागणार आहे. त्याचबरोबर एका दिवशी एका शेतकर्‍याला जास्तीत जास्त 25 गोण्या कांदा आणता येणार आहे.

याबाबत माहिती अशी की, नगर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने व्यापारी कांदा खरेदी करत असलेले घोडेगाव येथील कांदा मार्केट लॉकडाऊनमुळे मार्च महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यापासून बंद होते. लॉकडाऊन काळात सरकारच्या करोना नियमांचे पालन करून कांदा खरेदी करणे कठीण वाटल्याने हे मार्केट तेव्हापासून बंदच ठेवण्यात आले. काल मंगळवारी कांदा आडतदार व मार्केट कमिटी पदाधिकार्‍यांची बैठक झाली. त्यात शनिवारपासून मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मार्केट सुरू करताना काही नियम व बंधनेही टाकण्यात आली असून त्यामुळे शेतकर्‍यांना कांदा मार्केटला घेऊन येण्याआधी मार्केट कमिटीत नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यावर मार्केट कमिटी 200 शेतकर्‍यांनाच एका दिवशी कांदा आणण्यास परवानगी देणार आहे. एक शेतकरी एकावेळी केवळ 25 गोणी कांदा विक्रीसाठी आणू शकतील. व्यापारी वर्गालाही कांदा खरेदीची मर्यादा निश्चित करण्यात आली असून एक कांदा व्यापारी एका दिवशी केवळ 200 गोणी म्हणजे केवळ 8 शेतकर्‍यांचा कांदा खरेदी करू शकणार आहे.

याआधी घोडेगाव मार्केटमध्ये कांदा विक्रीला आणण्यासाठी शेतकर्‍यांना कोणतेही बंधन नव्हते. तसे व्यापार्‍यांनाही काही बंधन नव्हते. आता मात्र करोना संकटामुळे व सोशल डिस्टन्स राखले जाण्यासाठी गर्दी होऊ नये याकरिता बंधन घातले गेले आहे. आतापर्यंत सोमवार, बुधवार व शनिवार या तीन दिवशी कांदा लिलाव होत होते. आता सुरू करण्यात येत असलेल्या कांदा मार्केटसाठी लिलावाचे दिवस शनिवार व बुधवार असे दोनच निश्चित करण्यात आलेले आहेत. सर्वसाधारणतः एका दिवशी 6 हजार गोण्या एवढाच कांदा खरेदी व्हावा, असे मार्केट कमिटीचे नियोजन असल्याची माहिती मार्केट कमिटीचे सचिव देवदत्त पालवे यांनी दिली.

उद्या गुरुवारपासून कांदा विक्रीसाठी आणणार्‍या शेतकर्‍यांकरिता मार्केटमध्ये नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. शेतकरी, व्यापार्‍यांचा प्रतिसाद, सोशल डिस्टन्सिंगचे होणारे पालन या सर्वांचा विचार करून पुढील काळात कांदा खरेदी-विक्री मर्यादा व लिलावाच्या दिवसांमध्ये वाढ केली जाणार असल्याचे समजते. दरम्यान तब्बल अडीच महिन्यांनंतर कांदा मार्केट सुरू झाल्याने व त्यातही केवळ 25 गोण्याच कांदा आणण्याचे बंधन घातले गेल्याने शेतकर्‍यांपुढे मोठा प्रश्न उभा राहाणार आहे.

200 नोंदणीकृत शेतकर्‍यांनाच मिळणार प्रवेश

ज्या शेतकर्‍यांना कांदा विक्रीसाठी आणावयाचा आहे त्यांनी घोडेगाव बाजार आवार येथील कार्यालयात मोबाईल नंबर व किती गोण्या आणणार याची नोंदणी करावी. केवळ नेवासा तालुक्यातील शेतकर्‍यांचाच कांदा स्विकारला जाईल. नोंदणी केलेल्या नावाच्या व्यक्तीचे आधारकार्ड दाखविल्याशिवाय मार्केट कमिटीच्या आवारात प्रवेश नसेल. सकाळी 8 ते 12 पर्यंत कांदा उतरवला जाईल. प्रत्येक कांदा मार्केटच्या दिवशी नोंदणीकृत असलेल्या केवळ 200 शेतकर्‍यांनाच प्रवेश मिळेल. सोशल डिस्टन्सिंगचे नियमपालन बंधनकारक असेल.

-देवदत्त पालवे सचिव, मार्केट कमिटी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com