घोडेगावात पहिल्याच दिवशी 200 शेतकर्‍यांच्या कांद्याचे लिलाव
Featured

घोडेगावात पहिल्याच दिवशी 200 शेतकर्‍यांच्या कांद्याचे लिलाव

Sarvmat Digital

अटी-नियमांचे पालन करत उत्स्फूर्त प्रतिसाद; 850 रुपयांपर्यंत निघाला भाव

नेवासा (का. प्रतिनिधी)- तब्बल अडीच महिन्याच्या खंडानंतर कालपासून करोनाच्या पार्श्वभूमीवर विविध अटी व नियमांनुसार सुरु झालेल्या नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल पहिल्याच दिवशी शेतकर्‍यांचा चांगला प्रतिसाद लाभला. काल नोंदणी करुन सुमारे 200 शेतकर्‍यांनी 4 हजार 821 गोण्या कांदा विक्रीसाठी आणला होता. जास्तीत जास्त 850 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत भाव निघाले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी मार्केट कमिटीने शेतकर्‍यांनी कांदा घेवून येण्याआधी मार्केट कमिटीत नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. एका शेतकर्‍याला जास्तीत जास्त 25 गोण्या कांदा विक्रीस आणता येतो. त्याशिवाय कांदा व्यापार्‍यालाही जास्तीत जास्त 8 शेतकर्‍यांचा कांदा खरेदी करता येतो. कांदा घेवून येणार्‍याला आधारकार्ड सक्तीचे असून त्याला एकट्यालाच प्रवेश मिळतो. पहिल्यांदाच अशाप्रकारे बंधन व मर्यादा घालून दिल्याने कांदा मार्केटला कितपत प्रतिसाद मिळतो याबाबत शंका होती. मात्र शेतकर्‍यांचा चांगला प्रतिसाद लाभला.

येथील मार्केटमध्ये सध्या बुधवार व शनिवारी लिलाव होणार आहेत. कांदा आणण्यासाठी शेतकर्‍यांना सोमवार व गुरुवार या दोन दिवशी नोंदणी करावी लागणार असल्याचे मार्केट कमिटीच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. काल एक नंबर कांद्याला 600 ते 850 रुपये भाव मिळाला. दोन नंबरला 400 ते 600 रुपये, तीन नंबरला 200 ते 350 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 100 ते 250 रुपये तर गोल्टी कांद्याला प्रतिक्विंटल 350 ते 500 रुपये भाव मिळाला.

शेतकर्‍यांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद व नियमांचे पालन करत शिस्तबद्ध रित्या झालेले लिलाव यामुळे पुढील आठवड्यात शेतकर्‍यांना कांदा गोण्यांची मर्यादा 25 वरुन 50 गोण्यापर्यंत वाढविली जाण्याचा अंदाज व्यक्त होत असून त्यामुळे शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात कांदा मार्केटमध्ये नेते येणे शक्य होईल.

Deshdoot
www.deshdoot.com