घोडचे आवर्तन 25 तर विसापूरचे आवर्तन 15 ते 20 जानेवारीपासून सुटणार

jalgaon-digital
3 Min Read

आ. बबनराव पाचपुते यांची माहिती

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी)- घोड, विसापूर प्रकल्पातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी आज (रविवार दि.5 जानेवारी 2020) रोजी मढेवडगाव (ता. श्रीगोंदा) येथील कार्यालयामध्ये लाभक्षेत्रातील लाभधारक शेतकर्‍यांसह पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी तसेच इतर सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक झाली.

घोड धरणातील उपलब्ध पाणी साठ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी व उन्हाळ्यामध्ये कुठलाही शेतकरी पाण्यापासून वंचित राहू नये याकरिता नियोजनाची बैठक पार पडली. सदरची बैठक आमदार बबनराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

बैठकीस श्रीगोंदा कारखान्यांचे चेअरमन राजेंद्र नागवडे, भगवानराव पाचपुते, विठ्ठलराव काकडे,विजयसिंह मोकाशी, संदीप नागवडे,काकासाहेब रोडे, बाबासाहेब इथापे, भानुदास कवडे, सुनील जंगले टिळक भोस आदी मान्यवर व लाभधारक शेतकरी यांच्यासह जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बबनराव पाचपुते म्हणाले की, 17 डिसेंबर 2019 रोजी नागपूर येथे कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली सदरच्या बैठकीत घोड धरणामधून रब्बीसाठी दोन आवर्तने व उन्हाळ्यासाठी एक आवर्तन देण्याचा निर्णय झाला होता त्यानुसार रब्बीचे पहिले आवर्तन हे 10 जानेवारी 2020 पासून सोडण्याचे ठरले होते.

तथापि पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी तसेच लाभधारक शेतकर्‍यांची बैठक घेऊन त्यांच्या पाण्याच्या आवश्यतेनुसार/मागणीनुसार आवर्तन केव्हा सोडायचे हे स्थानिक पातळीवर ठरविले जावे असेही ठरले होते. त्यास अनुसरून आज मढेवडगांव येथे घोड व विसापूरच्या पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी तसेच लाभधारक शेतकर्‍यांची बैठक पार पडली.

यामध्ये आमदार पाचपुते यांनी असेही सूचित केले की मागील पाच वर्षात मध्ये घोडच्या पाण्याचे नियोजन व्यस्थित न झाल्यामुळे गेल्यावर्षीही धरण भरलेले असतानाही श्रीगोंदा तालुक्यातील चारही कारखाने उसाअभावी बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे .मागे काय झाले व त्यास कोण जबाबदार आहे.

या खोलात न जाता पुढील नियोजन कसे करायचे व शेतकर्‍यांना कसा दिलासा द्यायचा हे मोठे काम आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने व पाटबंधारे खात्यातील अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने आपणास पार पाडावयाचे आहे. त्यामुळे सोडण्यात येणार्‍या पाण्याचा काटकसरीने वापर करून कमी पाण्यात आवर्तन कसे होईल ज्यायोगे उन्हाळ्यामध्ये पाण्याची गरज असताना आपणास पाणी उपलब्ध होईल याची दक्षता घ्यावी असेही पाचपुते म्हणाले.

यावेळी बैठकीत चर्चा होत असताना मुख्य चार्‍यांना गेट नसणे, धरणावर अवैध पाणी उपसा, अपुरा कर्मचारी वर्ग, धरणावर जाणीवपूर्वक केली जाणारी पाण्याची गळती या सर्व विषयावर गांभीर्याने चर्चा झाली. त्याचप्रमाणे दुरुस्तीच्या कामाचे दुरुस्ती न करताच बोगस बिले काढली जातात याचीही चौकशी करण्याची मागणी संभाजी ब्रिग्रेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी केली.

तसेच मागील वर्षी घोड कॅनॉल फोडला त्यास जबाबदार असणार्‍यांवर कारवाई न झाल्यामुळे अशा प्रवृतीने वागणार्‍यांचे धाडस वाढू शकते. त्यामुळे राजकीय लोकांनी कोणासही पाठीशी न घालता त्याच्यावर कारवाई केली जावी,अशी मागणी श्रीगोंदा कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी केली.

सर्वांनुमते घोडचे आवर्तन 25 जानेवारीपासून तर विसापूरचे आवर्तन 15 ते 20 जानेवारीच्या दरम्यान सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. शाखाधिकारी श्री. देशमुख यांनी प्रास्ताविक केले व कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी आभार व्यक्त करून लाभधारक शेतकर्‍यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *