आठ दिवस शर्तीच्या प्रयत्नानंतर कचरा डेपोची आग आटोक्यात

jalgaon-digital
4 Min Read

अग्निशामक दलाची प्रयत्नांची पराकष्टा; आरोग्य विभागाने घटना टाळण्यासाठी नियोजन करावे

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- नगरपालिकेच्या कचरा डेपोला लागलेली आग अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकष्टा करावी लागली. अखेर शर्तीचे प्रयत्न करुन आठ दिवसानंतर आग आटोक्यात आली. ही आग विझविण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून कचरा डेपोपासून 500 फुट अंतरावरुन पालिकेच्या विहिरीवरुन करण्यात आलेली पाईपलाईन महत्वपूर्ण ठरली.

शहरात जुन्या कचेरीच्या मागील बाजूस खबडी परिसरात असलेल्या पालिकेच्या कचरा डेपोस दि. 4 मे 2020 रोजी पहाटे आग लागली होती. आग लागल्याच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल तातडीने दाखल झाले. मात्र कचरा डेपोत कचर्‍याचे झालेले दोन ते तीन मजली उंचीच्या ढिगामुळे अग्निशामक वाहनास आत पोहचण्यास अडचणी येत होत्या. तर काही ठिकाणी ओल्या कचर्‍यामुळे अग्निशामक वाहन फसण्याचेही प्रकार घडले. अशा अनेक समस्यांचा सामना अग्निशामक विभागास करावा लागला.

दररोज शहरातील दशमेशनगर येथील बोअरवेलवरुन 6 हजार लिटर पाणी क्षमतेच्या अग्निशामकाद्वारे 15 ते 16 ट्रिपा असे सलग आठ दिवस पाणी मारुनही आग आटोक्यात येत नव्हती. अखेर अग्निशामक विभाग वाहन प्रमुखांनी नियोजन करुन जवळच असलेल्या पालिकेच्या विहिरीवरुन 500 फुट पाईपलाईन करुन तातडीची उपाययोजना केली. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यात मोठी मदत झाली. विशेष म्हणून ज्या कालावधीत कचरा डेपोला आग लागली. त्यावेळेस अग्निशामक दिन होता. मात्र अशा परिस्थितीतही ते आपले कर्तव्य बजावताना दिसून आले. तर नगराध्यक्षा अनुराधा आदिक या देखील घटनास्थळी दाखल होऊन माहिती घेत होत्या.

दरम्यान, कचर्‍यात राख तसेच कचरा डेपो मोठा असल्याने गॅस तयार होऊन तीव्र उष्णतेमुळे कचरा डेपोस वर्षातून एक ते दोन वेळेस आग लागण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे हे लक्षात घेऊन आरोग्य विभागाने आता तरी जागे होऊन अशा घटना टाळण्यासाठी जागे होऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे. पालिकेकडे मुरूम, पोकलॅण्ड, जेसीबी आदी सर्व साधनसामुग्री उपलब्ध आहे. आग विझविण्यासाठी कचरा डेपोत जाण्यासाठी कचर्‍याच्या ढिगामुळे अडचण येणे ही महत्वाची अडचण आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने नियोजन करुन मुरूम टाकून निदान अग्निशामक वाहन अशा संकटसमयी सुरक्षितपणे आतपर्यंत जाऊ शकेल, अशा पध्दतीने रस्ता करणे गरजेचे आहे.

मार्च, एप्रिल व मे महिन्यात उष्णता जास्त प्रमाणात असते. त्यामुळे गॅस तयार होऊन तसेच कचर्‍यात चुलीतील राख येऊन या माध्यमातूनही आग लागण्याची शक्यता असते. यासाठी उन्हाळ्यात निदान आठव्यातून तीन ते चार वेळेस पाणी मारल्यास अशा घटनांना आळा बसेल. मात्र याबाबत कुठलीही काळजी घेतली जात नाही.
आठ दिवस सुरु असलेल्या आगीमुळे कचरा डेपो परिसरात मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होत होता.

त्यामुळे फकीरवाडा, सेंट लुक हॉस्पिटल, गोंधळी हॉस्पिटल परिसर, कॉलेज परिसर, अशिर्वादनगर, इंदिरानगर, शिरसगाव, कुदळे वस्ती, गोंधवणी, भैरवनाथनगर, गोंधवणी रोड, अचानकनगर या भागातील नागरिकांना या धुरामुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. करोना संकटात आरोग्याच्यादृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत असताना कचरा डेपोस लागलेल्या आगीतून निघणार्‍या विषारी धुराचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागला. दरम्यान, या कचरा डेपोला एप्रिल-मे महिन्याच्या रखरखत्या उन्हाळ्यात आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे या कचरा डेपोवर उन्हाळ्यात तरी आठवड्यातून तीन ते चार वेळेस पाणी मारल्यास अशा घटनांना आळा बसू शकेल.

ठेकेदाराकडून खर्च वसुल करणार का ?
आगीसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी पालिकेकडून अग्निशामक वाहन उपलब्ध करुन दिले जाते. त्यासाठी पालिकेकडून नियमाप्रमाणे संबंधितांकडून कर वसुली केली जाते. मात्र आता पालिकेच्या ज्या कचरा डेपोला आग लागलेली आहे. कचर्‍याचा ठेका देण्यात आलेला आहे. आग विझविण्याचे काम सुमारे 8 दिवस सुरु होते. या कालावधीत दररोज 6 हजार लिटर क्षमतेच्या अग्निशामक वाहनाद्वारे 15 ते 16 ट्रिपा मारुन कचरा डेपोवर पाणी मारण्याचे काम सुरु होते. यासाठी लाखो रुपयांचा खर्च झाला आहे. त्यामुळे आता पालिका अग्निशामक वाहनासाठी झालेला खर्च ठेकेदाराकडून वसुल करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *