Friday, April 26, 2024
Homeनगरकचरा संकलन करणार्‍या ठेकेदारावर गुन्हा दाखल करा

कचरा संकलन करणार्‍या ठेकेदारावर गुन्हा दाखल करा

शिवसेनेची मागणी : मनपा युनियनने केलेल्या संपात सहभाग घेणे बेकायदेशीर

अहमदनगर (प्रतिनिधी)- सध्या कोरोना महामारीने संपूर्ण जगाला ग्रासलेले असताना या आणीबाणीच्या प्रसंगात सर्वानी माणुसकीच्या नात्याने एकजूट दाखवून समाजाची सेवा करणे आवश्यक आहे. या युद्धाच्या प्रसंगी कोणत्याही कारणास्तव आपल्या कामात कसूर करणार्‍या कर्मचार्‍यावर थेट कारवाई करण्यात येते आहे. महापालिका कर्मचारी युनियनने केलेल्या दोन दिवसांच्या संपात कचरा संकलन करणार्‍या खासगी संस्थेने सहभागी होणे चुकीचे असून, त्यांनी दोन दिवस काम बंद ठेऊन नगरकरांना वेठीस धरल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेचे उपप्रमुख गिरीष जाधव यांनी केली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना त्यांनी हे निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, की कोरोनामुळे जनतेत घबराटीचे वातावरण आहे. अशा आणीबाणीच्या काळात कोणत्याही सरकारी, निमसरकारी किंवा खासगी यंत्रणांनी काम करण्यास टाळाटाळ करणे अपेक्षित नाही. तरीही अहमदनगर महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी 4 व 5 एप्रिल रोजी संप पुकारला होता.

या संपाशी नगर शहरातील कचरा उचलणार्‍या स्वयंभू ट्रान्सपोर्ट या ठेकेदार संस्थेचा संबंध नाही. मनपा कर्मचार्‍यांनी संप केला असला तरी स्वयंभू ट्रान्स्पोर्टस ठेकेदार संस्थेने कचरा उचलणेचे काम बंद करणे अयोग्य होते. संबंधित ठेकेदाराने नगरच्या जनतेसाठी धोका निर्माण केला. ठेकेदाराची ही कृती पूर्णपणे बेकायदेशीर असून संपात सहभागी होऊन आपल्या कर्तव्यात हलगर्जीपणा करणार्‍या दोषी ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्यात यावेत.

जाधव यांनी ‘आपले सरकार’ वेब पोर्टलवरही ही तक्रार केली आहे. मनपाच्या दोन स्वच्छता कर्मचार्‍यांना मारहाण झाली होती. घडलेली घटना निषेधार्ह आहे. दोषी व्यक्तीवर गुन्हे देखील दाखल झाले आहेत. त्यांना अटकही झाली आहे. कोरोना जागतिक आपत्ती आहे. अशा परिस्थितीत कोणत्याच यंत्रणेने हलगर्जीपणा करून चालणार नाही. असे असतानाही मनपा कर्मचार्‍यांनी संप पुकारला. या संपाबाबत अधिकारी गप्प का? मनपाचे आरोग्य अधिकारी यांना शहरातील कचरा दोन दिवस उचलला न गेल्यास काय परिस्थिती उदभवू शकते याची कल्पना नव्हती का? अधिकार्‍यांनी संप करणार्‍यांकडे दुर्लक्ष का केले? ठेकेदाराला नोटीस का काढली नाही? नगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी व्यक्तिगत स्वच्छता तसेच परिसर स्वच्छतेच्या सूचना वारंवार दिल्या जात आहेत.

याची अंमलबजावणी होते आहे कि नाही, तसेच कर्मचारी काटेकोरपणे काम करतात की नाही, यावर अधिकारी लक्ष ठेऊन आहेत. कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी प्रशासकीय यंत्रणा, पोलीस आणि आरोग्य खात्यातील सर्वजण दिवसाचे 14 -14 तास काम करीत असताना पालिकेच्या राजकारणात विशेष रस दाखवून ठेकेदाराने संपात का सहभाग घेतला, याची चौकशी करावी. ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जाधव यांनी केली आहे. कोरोनामुळे जाधव यांनी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी आणि आयुक्तांची भेट न घेऊन हे निवेदन इ-मेल व सोशल माध्यमाद्वारे पाठविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या