Thursday, April 25, 2024
Homeनगरगंगागिरी महाराज सप्ताहावर करोनाचे सावट!

गंगागिरी महाराज सप्ताहावर करोनाचे सावट!

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- करोनामुळे लग्न, सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यावर आता बंदी आली आहे. त्यामुळे लाखो भक्तांच्या उपस्थितीची उच्चांकीची नोंद गिनीस वर्ल्ड बुकमध्ये नोंद झालेल्या गंगागिरी महाराज यांच्या यंदाच्या 173 व्या हरिनाम सप्ताहाला प्रशासनाकडून परवानगी मिळाली तरच सप्ताह होणार आहे. दरम्यान परवानगी मिळावी म्हणून सप्ताह कमिटीने जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.

श्रीरामपूर शहराजवळ शिरसगाव हद्दीत ऑगस्ट महिन्यात हा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नगर, पुणे, नाशिक सह मराठवाड्यातील सुमारे सात ते आठ लाख भाविक या सप्ताहात सहभागी होतात. सप्ताहात प्रत्येक वर्षी गर्दीचे नवनवीन विक्रम मोडले जातात. पंगतीला बसून आमटी भाकरीचा प्रसाद खाण्याचा आनंद फारच वेगळा आहे. याशिवाय पुरणपोळी, मांडे, एकादशीला उपवासाची खिचडी आणि शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन व बुंदीच्या प्रसादाने सप्ताहाची सांगता होते. भाविकां बरोबर राज्याचे अनेक मंत्री, आमदार, खासदार, नेते या सप्ताहाला हजेरी लावतात.

- Advertisement -

गंगागिरी महाराज यांनी सराला बेटावर 8-10 भाविकांमध्ये सप्ताहाची सुरुवात केली. ती अखंडीपणे आजही कायम आहे. त्यांच्या निधनानंतर 1957 पासून या बेटाचे महंत नारायणगिरी महाराज यांनी सप्ताहाची व्याप्ती वाढविण्यासाठी लोकांचा सहभाग घेतला. त्यामुळे सप्ताहाचे महत्त्व वाढत गेले. त्यांच्या निधनानंतर महंत रामगिरी महाराज यांनी 2009 साला पासून बेटाची जबाबदारी स्वीकारली.

यावर्षी करोनाचे संकट आहे. सप्ताहाला लाखो भाविक सहभागी होतात. सरकारने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करणे कठीण आहे. अशा स्थितीत प्रशासनाकडून परवानगी मिळणार नाही. असे असले तरी सप्ताहाची परंपरा खंडीत करता येणार नाही. यासाठी सराला बेटावर 20 भाविकांमध्ये सप्ताह करावी लागणार आहे. म्हणजे गंगागीर महाराज यांनी जेव्हा सप्ताहाची परंपरा सुरु केली.

सप्ताहाला परवानगी नाही
गंगागिरी महाराज सप्ताहाला मोठी गर्दी असते. करोनामुळे सरकारने खबरदारी घेतली आहे. गर्दी होणारे धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देता येत नाही.
– अनिल पवार, उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर.

परवानगी मिळाली तरच सप्ताह
शिरसगाव येथे गंगागीरी महाराज यांचा सप्ताह घेण्याकरिता जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे. कमिटीने जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. परवानगी मिळाली तर सप्ताह होईल, अन्यथा 15 ते 20 भाविकांच्या उपस्थितीत हा 173 वा अखंड हरिनाम सप्ताह करावा लागणार आहे.
– मधु महाराज, सराला बेट.

- Advertisment -

ताज्या बातम्या