Wednesday, April 24, 2024
Homeनगरफसवणूक करून मोबाईल घेतले; नाशिकमध्ये दुकान थाटले

फसवणूक करून मोबाईल घेतले; नाशिकमध्ये दुकान थाटले

भामट्याची करामत : नगर येथील व्यापार्‍यांकडून घेतला लाखोंचा माल

अहमदनगर – एकाने शहरामधून अनेक होलसेल मोबाईल दुकानदारांकडून माल घेत तीन लाखांना गंडा घातला. खरेदी केलेला माल नाशिक येेथे घेऊन जात पंचवटी भागात मोबाईलचे दुकान थाटले. मात्र, पोलिसांनी या सर्व गोष्टीचा भंडाफोड करत आरोपीवर गुन्हा दाखल करत त्यास अटक केली. निलेश सतीश चौहान असे या भामट्याचे नाव आहे. आठ दिवस कोठडीत मुक्काम करून आता तो जामिनावर बाहेर आला असला तरी त्याने अनेकांना गंडा घातला आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, ऑक्टोबर 2019 मध्ये चौहान याने सुरूवातीला एक महिन्यासाठी केडगाव येथील सोनेवाडी चौकात मोबाईलचे दुकान थाटले. दुकानामध्ये मोबाईल, मोबाईलचे साहित्य, मोबाईल रिचार्ज आदींसाठी त्याने नामी शक्कल लढवली. 23 ऑक्टोबरला चौहान याने पुणे बसस्थानकच्या बाजूला असलेल्या सोहम बिल्डकॉन अ‍ॅण्ड रिटेलर प्रा. लिमिटेड यांच्याकडून काही मोबाईल विकत घेतले व त्याचे पैसे त्यांना रोख स्वरूपात दिले.

यावेळी त्याने सोहमचे मॅनेजर यांना बतावणी करत ‘माझे केडगावला मोबाईलचे दुकान आहे. मला ऑर्डरप्रमाणे माल देत जा’, अशी विनंती केली. सोहमवाल्यांनी चौहानकडून आधार, पॅन व सिक्युरिटीसाठी चेक घेतले. 25 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर या दरम्यान सोहमवाल्यांकडून चौहान याने जिओ, आयटेल, टेक्नो असे मोबाईल, अनुरॉन कंपनीचा टीव्ही असा दोन लाखांचा माल खरेदी केला. या मालाचे चौहान याने 15 हजार रुपये रोख स्वरूपात दिले. उर्वरित रक्कमेचे इंडसईन बँकेचे चेक दिले.

सोहमवाल्यांनी चेक मर्चंन्ट बँकेत जमा केले. परंतु, चौहान याचे खाते बंद असल्याने चेक वटले नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे सोहम बिल्डकॉन अ‍ॅण्ड रिटेलर प्रा. लिमिटेडच्या मॅनेजर यांच्या लक्षात आले. त्यांनी केडगाव येथील चौहानच्या मोबाईल दुकानात धाव घेतली तर तेथील मोबाईल दुकान बंद असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

मॅनेजरने याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौहान याच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी चौहान याला अटक केली. त्याने शहरातील चौघा होलसेल मोबाईल दुकानदारांना गंडा घातल्याचा प्रकार पोलीस तपासात समोर आला. या होलसेल मोबाईल दुकानदारांकडून जिओ, आयटेल, टेक्ना, नोकिया, मायक्रोमॅक्स कंपनीचे मोबाईल, अनुरॉन टिव्ही, एअरटेल मनी, एअरटेल प्रिपेड बॅलन्स असा तीन लाख 13 हजार रुपयांचा माल खरेदी केला.

केडगावात एक महिना मोबाईलचे दुकान चालविले. नंतर हे दुकान बंद करून नाशिक येथील पंचवटी भागात दुकान सुरू केले. महागडे मोबाईल विकून टाकले. पोलिसांनी नाशिक येथे जाऊन चौहानच्या मोबाईल दुकानात धाड टाकली व तेथे 58 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्याचा तपास कोतवालीचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे यांनी केला.

फसवणूक करून खरेदी केलेला माल

अ.नं. पुरवठा माल संख्या किंमत (रुपये)
1) जिओ मोबाईल 70 96,600
2) आयटेल मोबाईल 45 41,355
3) टेक्ना मोबाईल 5 37,976
4) अनुरॉग टिव्ही 1 15,000
5) नोकिया मोबाईल 6 40,493
6) मायक्रोमॅक्स 20 37,385
7) एअरटेल मनी बॅलन्स – 40,000
8) एअरटेल प्रिपेड बॅलन्स – 05,000
एकुण रक्कम 3,13,809

- Advertisment -

ताज्या बातम्या