परदेशी तबलिकी नागरिकांची कारागृहात कसलीही बडदास्त नाही
Featured

परदेशी तबलिकी नागरिकांची कारागृहात कसलीही बडदास्त नाही

Sarvmat Digital

तक्रारीत तथ्य नसल्याचे पारनेर सहायक पोलीस निरिक्षकांचे मत

पारनेर (तालुका प्रतिनिधी)- पारनेर पोलीस ठाण्याच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलेल्या 26 परदेशी तबलिकी नागरिकांपैकी एकालाही करोनाची लागण झालेली नसून त्यांचे सर्व अहवाल निगेटीव्ह आलेले आहे. त्यांची न्यायालयाच्या निर्देशाव्यतिरीक्त कोणतीही बडदास्त ठेवली जात नाही. स्थानिक नागरिकही त्यांच्या संपर्कात नसल्याचा खुलासा सहाय्यक पोलीस निरिक्षक राजेश गवळी यांनी केला.

पर्यटक व्हिजा घेऊन देशात धर्मप्रसार करीत असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या परदेशी नागरिकांना न्यायालयाने जामीन नाकारून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्यानंतर त्यांना पारनेर येथील कोठडीत ठेवण्यात आले आहे. या आरोपींना नगर येथील न्यायालयात नेण्यासाठी जवळचे ठिकाण म्हणून पारनेरची निवड करण्यात आली असून त्यामागे कोणताही दुसरा हेतू नाही.

या नागरिकांना डेटॉल साबण, सॅनिटायजर, मास्क तसेच टुथपेस्ट व्यतीरिक्त काहीही पुरविण्यात आलेले नाही. रमजानचे उपवास असल्याने त्यांना न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे पहाटे व सायंकाळी जेवण दिले जाते. जेवणामध्येही सामान्य आरोपींना जे जेवण दिले जाते. त्याचाच समावेश असून जेवणाचीही कोणतीही विशेष सुविधा देण्यात आलेली नाही. या आरोपींनी इतर काही मागण्या केल्या होत्या, परंतू न्यायालयाच्या आदेशास आधीन राहून त्यांना त्या सुविधा देण्यात आलेल्या नाहीत.

या परदेशी नागरिकांना पारनेर येथे आणल्यानंतर त्यांची विशेष बडदास्त ठेवण्यात आलेली आहे. त्यांना करोना विषाणूची बाधा झालेली आहे. स्थानिक नागरीक या आरोपींच्या संपर्कात असून ते दररोज पहाटे तसेच दिवसभरात त्यांच्याशी संपर्क करतात. त्यांना फळे तसेच विविध प्रकारचे जेवण पुरविले जाते. अशा प्रकारच्या अफवा दोन दिवसांपासून शहरात पसरल्या होत्या.

परदेशी आरोपींच्या संपर्कात आलेल्या स्थानिक नागरिकांमुळे शहरात करोनाचा प्रादुर्भाव होईल, अशी भितीही व्यक्त करण्यात येत होती. त्या पार्श्वभुमिवर उपनगराध्यक्ष दत्तात्रय कुलट यांच्यासह नगरसेवक चंद्रकांत चेडे, अर्जुन भालेकर, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, विशाल शिंदे, विजय वाघमारे, उदय शेरकर यांनी सहा. निरीक्षक गवळी यांची भेट घेऊन प्रशासनाची भुमिका स्पष्ट करून अफवांबाबत खुलासा करण्याची विनंती केली.

त्यावेळी गवळी यांनी प्रशासनाची भुमिका सविस्तरपणे मांडून न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचीही माहिती दिली. पोलीस ठाणेे तसेच कोठडीमध्ये सीसी टीव्ही असल्यामुळे तेथे कोणी भेटी दिल्या याची नोंद पोलीस प्रशासनाकडे आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शासनाने दिलेल्या लॉकडाउनच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे अवाहन केले. परदेशी नागरिकांबाबत कोणीही अफवा न पसरविता कोणास काही शंका असल्यास पोलीस प्रशासनाशी संपर्क साधवा. अफवा पसरविणारांविरोधात कठोर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com